भाजपमध्ये मतभेद? माजी मुख्यमंत्र्यांनी सुरू केली जन रसोई; पण फलकावर मोदींना स्थान नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 06:05 AM2021-06-02T06:05:17+5:302021-06-02T06:06:22+5:30
योजनेच्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची छायाचित्रे नसल्यामुळे राजकीय चर्चांना सुरुवात
कोटा : ‘वसुंधरा जन रसोई’च्या माध्यमातून येथे विनामूल्य अन्न पाकिटांचे वितरण तीन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले असून, त्याच्या फलकाने राजकीय वाद निर्माण केला आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष वसुंधरा राजे यांचे विश्वासू प्रल्हाद गुंजाळ यांनी वसुंधरा राजे यांच्या नावाने ही योजना सुरू केली आहे.
योजनेच्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची छायाचित्रे नसल्यामुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. गुंजाळ म्हणाले, “वसुंधरा राजे यांच्या आवाहनानुसार २८ मे रोजी मी ही योजना सुरू केली. झोपडपट्ट्या आणि खेड्यांमध्ये अन्न पाकिटे वितरित केली जात आहेत. राजे यांच्या पाठीराख्यांनी अनेक जिल्ह्यांत वसुंधरा जन रसोई सुरू केली आहे.”
वसुंधरा राजे यांच्यापेक्षा मोठा नेता राज्यात नाही. फलकावरील त्यांचे छायाचित्र हे राज्यातील सगळे नेते आणि कार्यकर्ते यांचे प्रतिनिधित्व करते, असे गुंजाळ म्हणाले. झालावारमध्ये झळकलेल्या फलकावर राजे यांचा मुलगा दुष्यंत सिंह यांचे छायाचित्र आहे. भाजपच्या एका कार्यकर्त्याने म्हटले की, “यातून दिसते ते हेच की, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत राजे गटाशी भाजपला लढावे लागू शकते.”