नेत्यांच्या मुलांना भाजपमध्ये तिकीट नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 09:09 AM2023-08-17T09:09:29+5:302023-08-17T09:10:37+5:30
घराणेशाही आणि वंशवादाच्या विरोधात भाजप देशभरात निवडणूक लढवत आहे.
संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भाजपमध्ये कोणत्याही नेत्याची मुलगी, मुलगा अथवा नातेवाइकाला कदापिही तिकीट मिळणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. घराणेशाही आणि वंशवादाच्या विरोधात भाजप देशभरात निवडणूक लढवत आहे.
काँग्रेससह विरोधी पक्षांना घराणेशाहीवरून घेरल्यानंतर, आता भाजपने तिकीट वाटपाच्या सर्वांत महत्त्वाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या नेत्यांना मोदी यांनी स्पष्ट सांगितले की, कोणी कितीही मोठा नेता असो, कोणाच्याही मुलाला, मुलीला अथवा नातेवाइकाला तिकीट मिळता कामा नये. तिकीट वितरणात युवक व महिलांना जास्तीतजास्त संधी मिळाली पाहिजे. एखाद्या जागी एखादा युवक नेता अनुभवी नेत्याच्या तुलनेत थोडासा कमी प्रभावी असला, तरीही युवक व महिलांना तिकीट दिले जावे.
अर्ध्या मंत्र्यांचे तिकीट कापण्याची शक्यता
- मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन्ही विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
- आधी मध्य प्रदेशबाबत बैठक झाली. यात राज्यातील भाजप सरकारची १९ वर्षांची अँटी इन्कम्बन्सी व सत्ताविरोधी मत कमी करण्यासाठी अर्ध्यापेक्षा अधिक आमदारांचे तिकीट कापण्यावर चर्चा झाली.
- काही अवघड जागा जिंकण्यासाठी सुमारे १२ खासदारांनाही विधानसभा निवडणुकीत उतरविण्याबाबत चर्चा झाली.
- भाजपच्या विद्यमान २३० जागांच्या विधानसभेत भाजपचे १२२ आमदार आहेत. यात जिंकणाऱ्या आमदारांची संख्या ३० ते ३५ सांगितली जात आहे.
- भाजप जिंकणाऱ्या जागा आज निश्चित करण्यात आल्या. त्याचबरोबर, सुमारे ६० अशा जागा आहेत, जेथे भाजप स्पर्धेत आहे.