'नेत्यांना निवृत्तीचं वय नसतं, राजकारण म्हणजे सरकारी नोकरी नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 12:04 PM2019-04-11T12:04:42+5:302019-04-11T12:10:08+5:30
राजकारण आणि सरकारी नोकरी यांची तुलना केली जाऊ शकत नाही, सरकारी कर्मचाऱ्याला ठराविक काळानंतर निवृत्त व्हावं लागतं मात्र राजकीय नेत्यांचे तसं नसतं.
नवी दिल्ली - राजकारण आणि सरकारी नोकरी यांची तुलना केली जाऊ शकत नाही, सरकारी कर्मचाऱ्याला ठराविक काळानंतर निवृत्त व्हावं लागतं मात्र राजकीय नेत्यांचे तसं नसतं असं मत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी एका मुलाखतीत मांडले आहे. लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुमित्रा महाजन यांनी पीटीआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत सुमित्रा महाजन यांनी भाजपाकडून लोकसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्यावर अप्रत्यक्षरित्या नाराजीही व्यक्त केली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना तिकीट नाकारल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. याच दरम्यान सुमित्रा महाजन यांनी हे वक्तव्य केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. सुमित्रा महाजन या मुलाखतीत म्हणाल्या की, राजकारणाशी तुलना सरकारी नोकरीसोबत केली जाऊ शकत नाही. सरकारी नोकरीमधील निवृत्तीचं वय आधीपासूनच ठरलेलं असतं. मात्र राजकारणात तसं होत नाही. कारण राजकीय नेता थेट जनतेच्या सुख-दुखा:त सहभागी असतो. जनतेची सेवा करताना त्याला वेळेचे बंधन नसतं असं त्यांनी सांगितले. तसचे मोरारजी देसाई हे वयाच्या 81 व्या वर्षी देशाचे पंतप्रधान झाले होते अशी आठवणही त्यांनी करुन दिली.
द वीक या संकेतस्थळाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या नेत्यांना लोकसभेचं तिकीट न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. मात्र शहा यांच्या मुलाखतीत कुठेही कोणत्या नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. पण 12 एप्रिल रोजीच सुमित्रा महाजन यांना 76 वर्ष पूर्ण होण्याआधी 5 एप्रिल रोजी सुमित्रा महाजन यांनी स्वत: यंदाची लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान गेली 5 वर्ष मी लोकसभेची अध्यक्ष असल्याने भाजपाच्या कोणत्याही बैठकीत उपस्थित राहू शकत नव्हते. त्यामुळे वय झालेल्या नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय भाजपाच्या कोणत्या बैठकीत पारित झाला याची कल्पना मला नाही. मात्र माझं इतकंही वय झालं नाही की मी राजकीय जीवनातून सन्यास घेईन. मी प्रामाणिकपणे भाजपाचं काम करेल असंही सुमित्रा महाजन यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील एका विद्यार्थी संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यावेळी तेथील एका विद्यार्थ्यांने राजकारणात नेत्यांनी कधी निवृत्त व्हावं असं तुम्हाला वाटतं? असा प्रश्न राहुल यांना विचारला होता. त्यावर राजकारणात निवृत्तीसाठी 60 वर्ष असावं असं माझं वैयक्तिक मतं असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले होते.