नेत्याच्या सुरक्षारक्षकाने काढली छेड; महिलेचा मर्सिडीजवर हल्ला
By admin | Published: May 20, 2015 02:38 AM2015-05-20T02:38:20+5:302015-05-20T02:38:20+5:30
रविवारी संध्याकाळी २३ वर्षीय साध्वी पांडे आपल्या बहिणीसोबत स्कूटीवरून डॉक्टरांकडे निघाली होती. एका ट्रॅफिक सिग्नलवर ती थांबली.
आग्रा : रविवारी संध्याकाळी २३ वर्षीय साध्वी पांडे आपल्या बहिणीसोबत स्कूटीवरून डॉक्टरांकडे निघाली होती. एका ट्रॅफिक सिग्नलवर ती थांबली. समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते अभिनव शर्मा यांचा ताफा तिच्या शेजारी येऊन थांबला. शर्मा यांच्या सुरक्षा रक्षकाने कारमधून साध्वीची छेड काढणे सुरू केले. मग काय? साध्वी चांगलीच संतापली आणि थेट सपा नेत्याच्या मर्सिडीज कारच्या बोनटवर चढली व गाडीच्या काचा फोडूनच शांत झाली.
आगऱ्यात ही घटना घडली. या घटनेचा दोन मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सर्वाधिक शेअर केला गेला. सुरक्षा रक्षकाने छेड काढल्यानंतर साध्वी आपल्या मोबाईलमधून त्याचे फोटो घेऊ लागताच, शर्मा यांच्या ताफ्यातील अन्य सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कथितरीत्या तिचा मोबाईल हिसकावून तो तोडून टाकला. यामुळे साध्वी संतापली. यानंतर थेट शर्मा यांच्या गाडीच्या बोनटवर चढत तिने विंडशील्ड तोडले. गाडीवर लागलेला सपाचा ध्वजही तिने फाडला. घटना उजेडात येताच, मी कुठलेही चुकीचे काम केले नसल्याचे साध्वी म्हणाली.
या घटनेनंतर अभिनव शर्मा पक्षाचे नेते नसल्याचा दावा समाजवादी पक्षाने केला. दरम्यान, शर्मा यांनी सुरक्षा रक्षकाची कामावरून हकालपट्टी केली आहे. (वृत्तसंस्था)
सुरक्षा रक्षकाची हकालपट्टी
या घटनेनंतर मी सुरक्षा रक्षकाला नोकरीवरून कमी केले आहे. सुरक्षा रक्षक तिची छेड काढत असल्याचे महिलेने मला सांगितले असते तर मी त्याची तिथेच खबर घेतली असती; पण मी काही बोलायच्या आतच महिलेने माझ्या गळ्यातील साखळी ओढली आणि गाडीचे नुकसान केले. अशा स्थितीत मी काय करणार होतो? असे अभिनव शर्मा यांनी सांगितले.
कष्टाच्या पैशाने विकत घेतलेली तुमची एखादी वस्तू नाहक कुणी तोडत असेल तर कुठलाही सामान्य माणूस अशीच प्रतिक्रिया देईल. मोबाईल न तोडता त्यांनी सुरक्षा रक्षकाविरुद्ध कारवाई केली असती तर मी असे वागलेच नसते. मी खूप हिंमत दाखवली, असेही नाही, हेही साध्वीने स्पष्ट केले.