झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 19:56 IST2024-07-03T19:56:24+5:302024-07-03T19:56:59+5:30
Jharkhand News: काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंडमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदल होत आहे. झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, हेमंत सोरेन हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM
काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंडमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदल होत आहे. झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, हेमंत सोरेन हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. हेमंत सोरेन यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय झारखंड मुक्ती मोर्चा आणि इंडिया आघाडीच्या आमदारांनी घेतला आहे. त्यानुसार सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी हेमंत सोरेन हे राजभवनाकडे रवाना झाले आहेत.
हेमंत सोरेन यांना काही महिन्यांपूर्वी मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, नुकताच कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची तुरुंगातून मुक्तता झाली आहे.
हेमंत सोरेन हे तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ते झारखंडचे तेरावे मुख्यमंत्री असतील. १५ नोव्हेंबर २००० रोजी बिहारचे विभाजन करून झारखंड या नव्या राज्याची निर्मिती करण्यात आली होती. दरम्यान, आज मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हेमंत सोरेन यांची विधानसभेतील आमदारांच्या दलाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती. हेमंत सोरेन यांनी ३१ मे रोजी अटकेची कारवाई होण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
झारखंडच्या राजभवनाकडून हेमंत सोरेन यांना भेटीसाठी ७.३० ही वेळ देण्यात आली होती. त्यानुसार हेमंत सोरेन आणि चंपई सोरेन हे राजभवनात दाखल झाले आहेत. तिथे हेमंत सोरेन नवे सरकार स्थापन करण्याचा दावा सागर करती. त्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना होईल.