सोनिया गांधींचे नेतृत्वच ‘काँग्रेसचे ऐक्य’ राखेल
By admin | Published: May 23, 2016 04:00 AM2016-05-23T04:00:44+5:302016-05-23T04:00:44+5:30
सोनिया गांधी यांचे नेतृत्वच काँग्रेसमध्ये ऐक्य राखू शकेल. त्यांच्याशिवाय पक्षात फाटाफूट पडेल, असे मत केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : सोनिया गांधी यांचे नेतृत्वच काँग्रेसमध्ये ऐक्य राखू शकेल. त्यांच्याशिवाय पक्षात फाटाफूट पडेल, असे मत केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड केली जाण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच नायडू यांचे हे विधान आले आहे.
एका मुलाखतीत बोलताना नायडू म्हणाले की, नेतृत्व त्यांची अंतर्गत बाब आहे. सोनियांमुळे काँग्रेस एक आहे, एवढेच मी म्हणू शकतो. त्यांचे नेतृत्व नसते तर काँग्रेसची शकले उडाली असती. मला घराणेशाही मान्य नाही, तरीपण हे माझे स्पष्ट मत आहे. लोकशाहीत घराणेशाही ‘धोकादायक’ आहे; पण काँग्रेस आणि काही लोकांसाठी ती ‘चविष्ट’ आहे. सोनिया गांधी यांनीच पक्षात ऐक्य राखले, ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल. चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुडुच्चेरीत झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालाचा उल्लेख करून ते म्हणाले की, हे निकाल पाहता एक नेता म्हणून त्यांचे नेतृत्व यशस्वी झाले नाही. पराभवानंतर सोनिया गांधी यांनी ‘आत्मपरीक्षणा’चे आवाहन केले आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, हा आमच्या चिंतेचा विषय नाही. तो त्यांचा विषय आहे. त्यांना आपली धोरणे व कार्यप्रणाली यावर नव्याने विचार करावा लागेल. कामाची प्रणाली बदलावी लागेल.
पक्षात राहुल गांधी यांचे महत्त्व वाढले आहे. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नायडू म्हणाले की, काँग्रेस उपाध्यक्ष पूर्वीपासूनच व्यावहारिकपणे पक्ष चालवत आहेत. याबाबत कोणताही संशय नाही. ते जर पक्षाचे अध्यक्ष झाले तर विरोधी पक्षनेतेही होऊ शकतात. संसदेत त्यांची काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून निवड झाली तर काहीच अडचण नाही. तेच गेल्या १२ वर्षांपासून कामकाज पाहत आहेत, त्यांना काँग्रेस अध्यक्ष करणार असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा!