"कर्नाटकच्या पराभवातून धडा घ्या," पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा क्लास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 06:38 AM2023-05-29T06:38:02+5:302023-05-29T06:38:15+5:30
या मुख्यमंत्र्यांना त्यांनी २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत १०० टक्के जागा जिंकण्याचे लक्ष्य दिले.
संजय शर्मा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा रविवारी क्लास घेतला असून, कर्नाटकच्या पराभवातून धडा घेण्यास सांगितले आहे. या मुख्यमंत्र्यांना त्यांनी २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत १०० टक्के जागा जिंकण्याचे लक्ष्य दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप मुख्यालयात भाजपशासित राज्यांची मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपशासित राज्यांना १०० टक्के लोकसभा जागा जिंकण्याचे लक्ष्य मुख्यमंत्र्यांना दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी मुख्यमंत्र्यांना कर्नाटकच्या पराभवातून धडा घेण्यास सांगितले. तेथे अँटी इन्कम्बन्सीमुळे भाजपचा दारूण पराभव झाला होता.
या सर्व राज्यांतील भाजपच्या संघटन स्थितीवरही चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना तळागाळात जाऊन सर्वसामान्य लोकांना भेटण्यास व त्यांचे सुख-दु:खात सहभागी होण्यास सांगितले आहे. त्यांच्यापर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना घेऊन जाण्यासही सांगितले आहे. याबरोबर सर्व भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ३० मेपासून सुरू होणाऱ्या भाजपच्या देशव्यापी जनसंपर्क अभियानाचे लक्ष्य दिले आहे. आपापल्या राज्यांत प्रमुख प्रसिद्ध खेळाडू, चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक कार्यकर्त्यांना नावे विचारून त्यांच्याशी जनसंपर्क करण्यास सांगितले आहे. रविवारी दुपारी ३ वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी उशीरापर्यंत चालली. या बैठकीत सर्व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.
मध्य प्रदेशबाबत सर्वाधिक चिंता
विशेष म्हणजे नोव्हेंबरमध्ये पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका होणार आहेत.
त्यातील मध्य प्रदेशबाबत सर्वांत जास्त चिंता व्यक्त केली जात आहे.
छत्तीसगड व राजस्थानमध्ये आधीच काँग्रेसची सरकारे आहेत.
तेलंगणामध्ये बीआरएसचे सरकार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमधील सरकार वाचवण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान आहे.
योगींच्या अनुपस्थितीची सर्वत्र चर्चा
- पंतप्रधान मोदी यांनी बोलावलेल्या या महत्त्वाच्या बैठकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित नव्हते, याची चर्चा होत आहे.
- तथापि, भाजप नेत्यांनी सांगितले की, पंतप्रधानांना भेटून योगींनी त्यांची परवानगी घेतली व दिल्लीबाहेर गेले.
- यूपीमध्ये उद्या विधान परिषदेच्या दोन जागांसाठी मतदान होत असल्याचे कारण यासाठी पुढे केले जात आहे.