तामिळनाडूत पावसाच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 04:15 PM2021-11-11T16:15:33+5:302021-11-11T16:16:08+5:30
Tamilnadu Rain: गुरुवारी समोर आलेल्या चित्रांमध्ये चेन्नईच्या अनेक भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. यासोबतच काही ठिकाणी झाडे उन्मळु पडली असून, बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरातही पाणी शिरले आहे.
चेन्नई:तामिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नईसह अनेक जिल्ह्यांत रस्त्यांवर पाणी साचले, तर गुरुवारी झालेल्या पावसामुळे चेन्नई विमानतळावरील येणारी विमानसेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा गुरुवारी दुपारी 01.15 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विल्लुपुरम, कुड्डालोर, कल्लाकुरीची, कृष्णगिरी, धर्मपुरी, नमक्कल, पेरांबलूर, अरियालूर, चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि सालेम जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
चेन्नईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शहरातील 13 भुयारी मार्गातील तुंबलेले पाणी काढण्यात आले असून, 160 तोडलेली झाडेही काढण्यात आली आहेत. गेल्या 4 दिवसांत राज्यातील 20 लाख लोकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या(IMD) चेन्नई युनिटच्या उपमहासंचालकांनी पावसाची माहिती शेअर केली आहे. त्यांच्या मते, बंगालच्या उपसागरात चेन्नईजवळ कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश दरम्यान ते आज संध्याकाळी चेन्नईमधून जाईल. त्यामुळे जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्यातील 6 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
गुरुवारी समोर आलेल्या चित्रांमध्ये चेन्नईतील अनेक भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. यासोबतच काही ठिकाणी झाडेही उन्मळुन पडलेली दिसली. अनेकांचा घरातही पावसाचे पाणी शिरले आहे. हवामान खात्याने सांगितले की, कमी दाबाचे क्षेत्र 11 नोव्हेंबरच्या संध्याकाळी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर जाण्याची शक्यता आहे. हवामानाच्या या प्रवृत्तीमुळे पुढील तीन ते चार दिवस तामिळनाडूच्या मोठ्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 12 नोव्हेंबर रोजी निलगिरी हिल्स, कोईम्बतूर, सेलम, तिरुपत्तूर आणि वेल्लोरमध्ये पाऊस अपेक्षित आहे.
ईशान्य मान्सूनमुळे तामिळनाडूमध्ये 1 ऑक्टोबरपासून सरासरीपेक्षा 50 टक्के जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील 90 प्रमुख जलाशयांपैकी 53 जलाशयांमध्ये पाणी 76 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. या कालावधीत तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये 38 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली, जी 25 सेंटीमीटरच्या सामान्य पातळीपेक्षा 51 टक्के जास्त आहे.हवामान खात्याने सांगितले की 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार, तर बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.