देशातील निम्मी ‘एटीएम’ मार्चअखेर बंद होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:28 AM2018-11-22T05:28:58+5:302018-11-22T11:33:32+5:30
नियामक संस्थांनी लागू केलेल्या निर्बंधांच्या पालनासाठी करावी लागणारी जास्तीची गुंतवणूक परवडणारी नसल्याने देशातील २.३८ लाखपैकी १ लाख १३ हजार एटीएम मार्चअखेर बंद करावी लागतील, असा इशारा ‘कॉन्फेडरेशन आॅफ एटीएम इंडस्ट्री’ने बुधवारी दिला.
मुंबई : नियामक संस्थांनी लागू केलेल्या निर्बंधांच्या पालनासाठी करावी लागणारी जास्तीची गुंतवणूक परवडणारी नसल्याने देशातील २.३८ लाखपैकी १ लाख १३ हजार एटीएम मार्चअखेर बंद करावी लागतील, असा इशारा ‘कॉन्फेडरेशन आॅफ एटीएम इंडस्ट्री’ने बुधवारी दिला.
आमचा उद्योग आता न परवडण्याच्या अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, असा दावा करत संघटनेने म्हटले आहे की, एवढ्या मोठ्या संख्येने ‘एटीएम’ बंद झाली तर त्याचा रोजगारावरही विपरित परिणाम होईल. शिवाय बंद होऊ शकणारी बहुतांश ‘एटीएम’ बिगरशहरी भागातील असल्याने विविध सरकारी योजनांच्या लाभार्थींची गैरसोय होईल.
हे लाभार्थी थेट बँकेत जमा झालेल्या अनुदानाची रक्कम काढण्यासाठी ‘एटीएम’चा वापर करतात. परिणामी या लोकांनाही बँकिंगमध्ये सामावून घेण्याच्या सरकारच्या प्रयत्नांनाही खीळ बसेल. महासंघाने असा दावा केला की, नोटाबंदीच्या फटक्यातून ‘एटीएम’सेवा पुरवठादार सावरले नसतानाच नव्या नियामक निर्बंधांमुळे करावा लागणारा जादा खर्च परवडणारा नाही.