सुप्रीम कोर्टात प्रत्यक्ष सुनावणी किमान दोन आठवड्यांनंतरच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:35 AM2020-08-21T05:35:16+5:302020-08-21T05:35:26+5:30
त्यानंतरही अशी प्रत्यक्ष सुनावणी फक्त तीनच न्यायदालनांत होईल व तेथे मर्यादित संख्येने प्रकरणे सुनावणीसाठी घेतली जातील, असे न्यायालयाच्या प्रशासनाने स्पष्ट केले.
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे बंद असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांच्या सुनावणीचे काम आणखी किमान दोन आठवडे तरी सुरू होणार नाही व त्यानंतरही अशी प्रत्यक्ष सुनावणी फक्त तीनच न्यायदालनांत होईल व तेथे मर्यादित संख्येने प्रकरणे सुनावणीसाठी घेतली जातील, असे न्यायालयाच्या प्रशासनाने स्पष्ट केले.
न्यायालयातील प्रत्यक्ष सुनावणीचे काम कधी व कसे सुरू करावे यावर विचार करण्यासाठी सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी सात ज्येष्ठ न्यायाधीशांची समिती नेमली आहे. या समितीने ११ आॅगस्टच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती न्यायालयाचे एक अतिरिक्त व्यवस्थापक महेश टी. पाटणकर यांनी ‘अॅडव्होकेटस् आॅन रेकॉर्डस् असोसिएशन’ला पत्राने कळविली आहे. या पत्रानुसार न्यायाधीशांच्या समितीने न्यायालयातील तीन सर्वात मोठी, अशी तीन न्यायदालने, सर्व निर्बंधांचे पालन करून सुनावणीचे काम केले जाऊ शकेल अशा प्रकारे, तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आठवड्यांत तयार करण्यास सांगितले आहे. कालांतराने सुनावणीच्या प्रकरणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविली जाऊ
शकेल.
पत्रात असेही नमूद करण्यात आले की, ज्यांची अशा प्रत्यक्ष सुनावणीत सहभागी होण्याची इच्छा असेल अशाच पक्षकार/ वकिलांची प्रकरणे या तीन न्यायालयांमध्ये सुनावणीसाठी घेतली जातील. अशा प्रत्यक्ष सुनावणीतून सूट मिळण्याच्या विनंतीवरही सहानुभूतीने विचार केला जाईल.
याखेरीज इतर सर्व प्रकरणांची सुनावणी सध्याप्रमाणेच व्हर्च्युअल पद्धतीने सुरू राहील व त्यासाठी उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधाही आणखी वाढविण्यात येतील.
या समितीत न्या. एन.व्ही. रमणा, न्या. अरुण मिश्रा, न्या. रोहिंग्टन नरिमन, न्या. उदय लळित, न्या. अजय खानविलकर, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. एल. नागेश्वर राव यांचा समावेश आहे. समितीने यासंबंधात अॅडव्होकेटस् आॅन रेकॉर्डस् असोसिएशन, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन व बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली होती. या सर्व वकील संघटनांनी प्रत्यक्ष सुनावणी लवकरात लवकर सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती.
———————————
व्हर्च्युअल सुनावणीचे १०० दिवस
सुप्रीम कोर्टातील व्हर्च्युअल सुनावणीस गुरुवारी १०० दिवस पूर्ण झाले. या काळातील कामकाजाची काही ठळक आकडेवारी अशी-
एकूण १५,५९६ प्रकरणांवर सुनावणी.
त्यापैकी सुमारे ४,३०० प्रकरणे निकाली.
५०,४७५ वकिलांखेरीज पक्षकार व माध्यम प्रतिनिधींसह एकूण ६५ व्यक्तींचा सुनावणीत सहभाग.
६,१२४ नवी प्रकरणे दाखल. त्यापैकी २,९३० प्रकरणांचे ई-फायलिंग.या काळात न्यायालयाचे
कार्यालय एकही दिवस बंद राहिले नाही.
सुरुवातीला ३० टक्के व नंतर ५० टक्के कर्मचारी कामावर.
एकूण १२५ कर्मचारी व त्यांच्या निकटच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण.
सुदैवाने त्यातील कोणीही कोरोनाने दगावले नाही.