अहंकार सोडा; नोटबंदी तहकूब करा

By admin | Published: November 14, 2016 01:38 AM2016-11-14T01:38:17+5:302016-11-14T01:38:17+5:30

देशात आणीबाणी सारखी स्थिती आहे. लोक उपाशी मरत आहेत. बाजारपेठा ओस पडल्या आहेत. खरेदीसाठी लोकांकडे पैसे नाहीत. एटीएम, बँका, पोस्ट आॅफिसेस समोर बंद झालेल्या नोटा बदलण्यासाठी लांबलचक रांगा लागल्या आहेत.

Leave the ego; Quarantine ban | अहंकार सोडा; नोटबंदी तहकूब करा

अहंकार सोडा; नोटबंदी तहकूब करा

Next

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
देशात आणीबाणी सारखी स्थिती आहे. लोक उपाशी मरत आहेत. बाजारपेठा ओस पडल्या आहेत. खरेदीसाठी लोकांकडे पैसे नाहीत. एटीएम, बँका, पोस्ट आॅफिसेस समोर बंद झालेल्या नोटा बदलण्यासाठी लांबलचक रांगा लागल्या आहेत. ज्यांच्या घरी विवाह समारंभ आहेत, त्यांची अवस्था तर आणखीनच वाईट आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता नोटा बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने जनतेवर लादला व देशभर हलकल्लोळ उडाला आहे,अशी चौफेर टीका करीत केजरीवाल पंतप्रधानांना उद्देशून म्हणाले, मोदी आपला अहंकार बाजूला ठेवा आणि नोटबंदीचा निर्णय मागे घ्या. पुरेशी पूर्वतयारी झाल्यावर हा निर्णय भलेही पुन्हा लागू करा पण देशातल्या प्रामाणिक माणसाचे तूर्त हाल करू नका. जनतेला दिड महिन्याचा वेळ द्या आणि साऱ्या देशाला या संकटातून वाचवा.
रविवारी सायंकाळी भरगच्च पत्रपरिषदेत बोलतांना केजरीवाल भलतेच आक्रमक होते. ते म्हणाले, या देशात दोन प्रकारचे लोक आहेत. ज्यांकडे काळा पैसा नाही ते बिचारे लोक एटीएम आणि बँकांसमोर रांगा लावून उभे आहेत तर ज्यांच्यापाशी भरपूर काळा पैसा आहे, त्यापैकी एकही जण रांगेत उभा दिसत नाही. विशेषत: मोदी आणि भाजपचे जे मित्र आहेत, ते तर अधिकच भाग्यवान आहेत कारण या निर्णयाची अगोदरच त्यांना कल्पना होती. आपल्या साऱ्या बेहिशेबी पैशांची त्यांनी एकतर वेळीच सुरक्षित गुंतवणूक केली अथवा हा पैसा विविध मार्गाने बँकांमधे भरला गेला. उदाहरणच द्यायचे तर बडोदा बँकेचे देता येईल.
गतवर्षाच्या डिसेंबरपासून यंदाच्या जूनपर्यंत ज्या बँकेची ग्रोथ निगेटिव्ह होती. त्यात अचानक पैशांचा भरणा वाढला आणि ही बँक लगेच पॉझिटिव्ह ग्रोथ दाखवू लागली. हा पैसा नेमका कोणी जमा केला. कोण आहेत हे लोक? याची शंका आल्याशिवाय रहात नाही. भाजपच्या नेत्यांना व मोदींच्या उद्योगपती मित्रांना या निर्णयाची अगोदरच कल्पना होती, याचे अनेक पुरावे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.भ्रष्टाचार, काळाबाजारी आणि काळया पैशांच्या विरोधात इमानदारीत कोणतेही पाऊल सरकारने उचलले, सरकारची नियत साफ असेल तर केजरीवाल आणि आम आदमी पार्टी त्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी सर्वात पुढे असेल.
तथापि भ्रष्टाचार आणि काळा पैसा संपवण्याच्या नावाखाली जर अप्रामाणिक व बेईमान हेतूने नोटबंदीची ताजी योजना लागू करण्यात आल्यामुळे त्याचे समर्थन कदापि होउ शकत नाही. या योजनेव्दारे पंतप्रधानांनी साऱ्या देशाला सर्वात मोठा धोका दिला आहे.
देशभर नागरीक हवालदिल आहेत. आपल्याच पैशांसाठी त्यांच्या नशीबी बँका आणि पोष्ट आॅफिसेस शोधत हिंडण्याची पाळी
आली असून भिकाऱ्यासारखी त्यांची अवस्था आहे. गोव्यात आज पंतप्रधानांनी जे भाषण केले, ते ऐकुन वाईट वाटले. घिसाडघाईत घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचे इतके उतावीळ समर्थन कशासाठी? असा प्रश्न नक्कीच सर्वांच्या मनात आहे, असे केजरीवाल म्हणाले.

शून्य रकमेवर सुरू करण्यात आलेल्या जनधन योजनेतील बँक खात्यांमध्ये अचानक जमा झालेल्या मोठ्या रकमेवर
सरकारचे लक्ष आहे. सरकारने ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतरच्या अवघ्या दोन दिवसांत बँकांमध्ये अभूतपूर्व असे दोन लाख कोटी रुपये रोख जमा झाल्यानंतर सरकारने जनधन खात्यांवर लक्ष ठेवले आहे.
अर्थमंत्री अरूण जेटली निवेदनात म्हणाले की, जनधन योजनेतील खात्यांमध्ये अचानक पैशांचा ओघ वाढल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्या खात्यांचा असा वापर करणे चुकीचे असल्यामुळेच सुरवातीच्या काही दिवसांत बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध लादावे लागले. त्या खात्यांमध्ये भरलेल्या रकमेबाबत जर अयोग्य व चुकीचे आढळले तर संबंधित विभाग कारवाई करील, असेही त्यांनी निवेदनात म्हटले.

 

ममता बॅनर्जी यांची राष्ट्रपतींशी चर्चा -
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नोटांच्या मुद्यावर रविवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केली. ममता बॅनर्जी यांनी व्टिट केले आहे की, जुन्या नोटांचे चलन बंद केल्याने लोकांचे हाल होत आहेत. ही बाब आपण राष्ट्रपतींना सांगितली. १६ व १७ नोव्हेंबर रोजी या प्रश्नावर राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटण्याचे राष्ट्रपतींनी मान्य केले आहे.

 


जुन्या नोटा वापरू द्या : पिनाराई विजयन
पाचशे व हजारच्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत वापरु देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केंद्र सरकारने केली आहे. ते म्हणाले की, देश एका मोठ्या आव्हानाला सामोरे जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर निघून गेले. अर्थमंत्री जेटली यांना भेटून आपण जनतेच्या भावना पोहचविणार आहोत.

 


२००० रुपयांच्या नोटेची झेरॉक्स  देऊन भाजी खरेदी -
२००० रुपयांच्या नोटेची झेरॉक्स देऊन एक जणाने येथे भाजी विक्रेत्याची फसवणूक केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील अशोक या भाजी विक्रेत्याकडून एकाने १७०० रुपयांची भाजी खरेदी केली.
हा भाजी विक्रेता नंतर नोटा मोजत असताना त्याला ही झेरॉक्स नोट दिसली.

 


थोडा त्रास सहन करू शकत नाहीत का?
युद्धाच्या काळात आमचे सैनिक आठ आठ दिवस उपाशी राहून लढत असतात. आपण देशासाठी थोडाही त्रास सहन करु शकत नाहीत का? असा सवाल योगगुरु बाबा रामदेव यांनी केला आहे. दहशतवाद, नक्षलवाद आणि अवैध व्यवसाय रोखण्यासाठी दीर्घ उपाययोजना कराव्या लागतील, असेही ते म्हणाले.

Web Title: Leave the ego; Quarantine ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.