मुलींना घरातच ठेवा, छेडछाडीच्या घटनेवर आझम खान यांचा अजब सल्ला
By admin | Published: May 29, 2017 08:51 AM2017-05-29T08:51:15+5:302017-05-29T09:01:48+5:30
तरुणांचा एक गट दोन महिलांचा विनयभंग करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण उत्तरप्रदेशात संतापाचे वातावरण आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 29 - रामपूर जिल्ह्यात दिवसाढवळया तरुणांचा एक गट दोन महिलांचा विनयभंग करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण उत्तरप्रदेशात संतापाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वादग्रस्त विधान करण्याची आझम खान यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेकदा अशी विधाने केली आहेत. मुलींनी त्यांची छेडछाड होईल अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे असे विधान आझम खान यांनी केले आहे.
छेडछाड, महिलांशी गैरवर्तन, लूट, दरोडा आणि हत्या हे आता नित्याचेच झाले आहे. विधानसभा निवडणुकीआधी भाजपाला मतदान केल्याने काय धोका निर्माण होऊ शकतो त्याची मी मतदारांना कल्पना दिली होती. समाजवादी पक्षाचा सुशासनाचा कारभार लक्षात ठेवून मतदान करा असा मी सल्ला दिला होता. भाजपाला संधी दिली तर, कायदा-सुव्यवस्था बिघडेल हे मी आधीच सांगितले होते असे आझम खान यांनी म्हटले आहे.
परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेऊन पालकांनी त्यांच्या मुलींना घराबाहेर सोडू नये. घरातच आपल्या नजरेसमोर ठेवावे असे आझम खान यांनी म्हटले आहे. भाजपाच्या राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे विधानही त्यांनी केले. आझम खान यांचा मुलगा अब्दुल्लाह आझम ज्या स्वार-तांडा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे तिथे ही छेडछाडीची घटना घडली.
आझम खान यांनी जे म्हटलेय त्यामुळेच उत्तरप्रदेशच्या जनतेने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आपल्या असंवेदनशील विधानाबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे असे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री बलदेव सिंह म्हणाले. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गँगस्टर कायद्याखाली गुन्हा नोंदवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. योगी आदित्यनाथ सरकारमध्ये महिलांना त्रास देणे अजिबात सहन केले जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी आझम खान बुलंदशहरात घडलेला सामूहिक बलात्कार राजकीय कारस्थान असल्याचे म्हटले होते. आपल्या या वक्तव्याबद्दल त्यांना डिसेंबर 2016 सर्वोच्च न्यायालयात विनाशर्त माफी मागावी लागली होती.