सरकारी नोकरी सोडून कचोरी-समोसे विकले; मुलांना IIM-IITमध्ये शिकवले, 10 जणांना दिला रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 10:59 IST2023-07-22T10:50:51+5:302023-07-22T10:59:52+5:30
सत्यकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी मी डीटीसीमध्ये जीआय लेव्हल ऑफिसर होतो.

फोटो - news18 hindi
जर एखाद्याच्या कुटुंबाचे दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न असेल, तरी तो समोसे आणि कचोऱ्यांचे दुकान का काढेल?, हा प्रश्न सत्यकुमार यांच्या कचोऱ्या खायला जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येतो. एवढंच नाही तर चांगली सरकारी नोकरी सोडून छोटासा व्यवसाय का सुरू केला हेही समजत नाही. विशेष म्हणजे त्यांच्या समोसे आणि कचोरीची चव अप्रतिम आहे. ग्राहक त्यांच्या खाद्यपदार्थांची खूप प्रशंसा करतात.
सत्यकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी मी डीटीसीमध्ये जीआय लेव्हल ऑफिसर होतो. नोकरी सोडल्यानंतर मी दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर मी येथे समोसे बनवण्यास सुरुवात केली. नोकरीच्या तुलनेत या व्यवसायात नफा जास्त असल्याने मी हे करण्याचा निर्णय घेतला.
शर्मा यांनी सांगितले की, माझ्या मुलाने आयआयटी दिल्लीतून आणि दुसऱ्याने आयआयएममधून शिक्षण घेतले आहे. सध्या ते बंगळुरू येथील एका कंपनीत वार्षिक 40 लाख पगारावर काम करत आहेत. त्यांची पत्नीही याच कंपनीत त्याच पगारावर काम करत आहे. आयआयटी दिल्लीतून शिक्षण घेतल्यानंतर लहान मुलगा 35 लाखांच्या पॅकेजवर काम करत आहे.
घरामध्ये करोडोंचे वार्षिक पॅकेज आहे, मग तुम्ही सेवानिवृत्ती का घेत नाही, असा सवाल विचारला. तर सत्य कुमार यांनी उत्तर दिले की मी आता निवृत्ती घेतली तर येथे काम करणारे दहा लोक बेरोजगार होतील. याशिवाय लोकांनी कष्ट करत राहावे, म्हणून मी निवृत्ती घेत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.