मजुराने 2.5 लाखांचं कर्ज घेऊन बायकोला नर्स केलं; नवऱ्याला सोडून 'ती' प्रियकरासह पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 10:43 AM2023-10-04T10:43:18+5:302023-10-04T10:53:09+5:30
नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर पत्नीने आपल्या मजूर पतीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी प्रिया कुमारी प्रियकरासोबत पळून गेली.
झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात 'पती-पत्नी और वो' अशी एक विचित्र घटना समोर आली आहे. मजूर पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबाचे भवितव्य चांगले व्हावे, यासाठी अडीच लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्याची पत्नी प्रिया कुमारीला नर्सचं शिक्षण दिलं. नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर याच पत्नीने आपल्या मजूर पतीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी प्रिया कुमारी प्रियकरासोबत पळून गेली. तसेच दिल्लीतील एका मंदिरात प्रियकरासोबत लग्न केलं.
लग्नाचे फोटो प्रियाने पती टिंकू यादवला विविध लोकांमार्फत पाठवले. प्रिया कुमारीचा प्रियकर दिलखुश राऊतसोबतचा लग्नाचा फोटो पाहून पती टिंकू कुमार यादवच्या पायाखालची जमीनच सरकली. टिंकूने पत्नीच्या नर्सिंगच्या शिक्षणासाठी लाखो रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्याच पत्नीने त्याची फसवणूक करून प्रियकरासोबत पळून जाऊन मंदिरात लग्न केलं.
या संपूर्ण प्रकरणाबाबत पती टिंकू कुमार यादवने सांगितलं की, 19 सप्टेंबर रोजी पत्नी घरातून बेपत्ता होती. काही अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने त्याने गोड्डा जिल्ह्यातील शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान असं आढळून आलं की त्याची पत्नी प्रिया कुमारी दिलखुश राऊत नावाच्या तरुणासोबत फरार झाली होती. दोघेही पळून दिल्लीत पोहोचल्याचं टिंकूला समजलं. तिथल्या कुठल्यातरी मंदिरात दोघांनी लग्न केलं. लग्नाचे फोटो सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून टिंकूपर्यंत पोहोचले.
टिंकू यादव याने पोलिसांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली. याशिवाय संतप्त झालेल्या पतीने फसवणूक करणाऱ्या पत्नीकडे शिक्षणावर खर्च केलेले लाखो रुपये परत करण्याची मागणी केली आहे. 2020 मध्ये टिंकूने प्रिया कुमारीसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर प्रियाने पुढे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. कुटुंबाचे तसेच पत्नीचे उज्ज्वल भविष्य डोळ्यासमोर ठेवून टिंकूने कर्ज काढून पत्नीला गोड्डा जिल्ह्यातील शकुंतला नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.