बापरे! ९ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून बाहेर काढला LED बल्ब!
By मोरेश्वर येरम | Published: January 5, 2021 04:07 PM2021-01-05T16:07:51+5:302021-01-05T16:10:20+5:30
हैदराबाद येथील एका हॉस्पीटलमध्ये एका ९ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून चक्क 'एलईडी बल्ब' यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला आहे.
तेलंगणा
डॉक्टर हे देवमाणूस असतात याची कल्पना आपल्याला अनेक प्रसंगांतून येत असते. सध्या कोविड-१९ च्या प्रकोपात तर डॉक्टर्स कोविडयोद्धे बनून स्वत:च्या जीवाची बाजी लावून जनतेला जीवनदान देण्याचं काम करत आहेत. पण तेलंगणात एक वेगळाच प्रकार घडला आणि एका ९ वर्षीय चिमुकल्यासाठी डॉक्टर देवदूत बनून समोर आले आहेत.
हैदराबाद येथील एका हॉस्पीटलमध्ये एका ९ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून चक्क 'एलईडी बल्ब' यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला आहे. तेलंगणाच्या मेहबूबनगर येथे राहणाऱ्या प्रकाश नावाच्या ९ वर्षीय मुलानं मित्रांसोबत खेळत असताना 'एलईडी बल्ब' गिळला होता. त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर कुटुंबियांनी त्याला तातडीनं हॉस्पीटलमध्ये दाखल केलं.
डॉक्टरांनी सीटी स्कॅन केल्यानंतर प्रकाशच्या फुफ्फुसांमध्ये एलईडी बल्ब असल्याचं दिसलं आणि कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला. बालरोग तज्ज्ञांनी तात्काळ ब्रॉन्कोस्कोपी करुन अवघ्या १० मिनिटांत एलईडी बल्ब बाहेर काढला आणि प्रकाशचे प्राण वाचवले. प्रकाशला त्याच दिवशी डिस्चार्ज देऊन घरी देखील पाठवण्यात आलं. डॉक्टरांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि सेवाभावाच्या कर्तव्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
"वेळीच उपचार केल्यानं यशस्वीरित्या बल्ब बाहेर काढता आला. चार किंवा पाच वर्षांची मुलं चुकून बिया, लहान वस्तू किंवा खेळणी इत्यादी गिळतात अशा अनेक घटना घडत असतात. पण एलईडी बल्ब गिळल्याचा प्रकार जास्त धोकादायक होता. कारण बल्बला असलेली तार अतिशय टोकदार होती. त्यामुळे श्वसननलिका आणि फुफ्फुसांना इजा पोहोचण्याची दाट शक्यता होती. त्यात केमिकल रिअॅक्शनमुळे अंतर्गत रक्तस्त्रावाचीही शक्यता होती. वस्तू आणखी खाली गेली असती तर थेट ओपन सर्जरी करावी लागली असती", असं प्रकाशला जीवदान देणाऱ्या डॉ. रघु कांत यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितलं. प्रकाशच्या फुफ्फुसांमध्ये एलईडी बल्ब १२ तासांहून अधिक काळ होता, असंही त्यांनी सांगितलं.