एकाच छत्राखाली डाव्यांची एकजूट?
By admin | Published: May 18, 2016 04:22 AM2016-05-18T04:22:21+5:302016-05-18T04:22:21+5:30
कम्युनिस्ट आणि डाव्या पक्षांना एकाच छत्राखाली पुन्हा एकजूट केले जावे.
हैदराबाद : कम्युनिस्ट आणि डाव्या पक्षांना एकाच छत्राखाली पुन्हा एकजूट केले जावे. एकाच झेंड्याखाली आलेल्या या पक्षांचे विलीनीकरण नव्हे, तर एकत्रीकरण असावे, असे सांगत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नव्याने आघाडीचा नारा दिला आहे.
कम्युनिस्ट चळवळीचे पुन्हा एकत्रीकरण केले जावे. ते विलीनीकरणापेक्षा वेगळे असेल. विलीनीकरण म्हणजे एक पक्ष दुसऱ्यात विलीन होणे होय, असे भाकपचे सरचिटणीस सुरावरम सुधाकर रेड्डी यांनी सांगितले. ते म्हणाले की, १९६४मध्ये कम्युनिस्टांमध्ये ज्या आधारावर फूट पडली तो मुद्दा आता विसंगत बनला आहे.
दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या पक्षांच्या मोहिमा, धोरणे आणि कार्यक्रमांमध्ये कोणताही फरक नाही. त्यामुळेच ते एकाच नावाखाली एकत्र यायला हवे. डाव्या पक्षांचे एकत्रीकरण होईलच याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. मात्र हे उद्दिष्ट गाठण्यासाठी किती वेळ लागेल ते सांगता यायचे नाही. (वृत्तसंस्था)
माकपकडून हवा सकारात्मक प्रतिसाद
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामधील मित्रांवर एकीकरण अवलंबून असेल. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्यासाठी संयमाने प्रतीक्षा करण्याची आमची तयारी आहे.
माकपसह डाव्या पक्षांमधील मोठ्या संख्येने कार्यकर्ते चळवळीचे पुन्हा एकत्रीकरण करण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक आहेत. अधिकाधिक संयुक्त मोहिमा आम्हाला एकत्र आणतील.
पक्षांमध्ये त्याबाबत स्पष्टता, मतैक्याची गरज आहे. पुन्हा एकत्रीकरण हे सर्व काळासाठी असावे. पुन्हा वेगळे होण्यासाठी आम्ही एकजूट करणार नाही, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले.