लेफ्ट. कर्नल पुरोहित आरोपी नाही
By admin | Published: April 21, 2016 03:31 AM2016-04-21T03:31:36+5:302016-04-21T03:31:36+5:30
समझोता एक्स्प्रेस स्फोटप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नसून तो या स्फोटातील आरोपी नाही
नवी दिल्ली : समझोता एक्स्प्रेस स्फोटप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नसून तो या स्फोटातील आरोपी नाही, असा खुलासा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केला आहे. परंतु मालेगाव स्फोटात मात्र त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे.
एनआयएचे महासंचालक शरदकुमार यांनी मंगळवारी सांगितले की, समझोता स्फोटप्रकरणी पुरोहितविरुद्ध पुरावे नाहीत. याप्रकरणात त्याचे नाव कसे गोवले गेले याबद्दल मला आश्चर्य वाटते. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणात मुंंबईच्या दहशतवादविरोधी सेलने (एटीएस) पुरोहितविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते आणि एनआयए याप्रकरणाचा तपास करीत होती. तपास संस्थेने समझोता स्फोटप्रकरणी नभकुमार सरकार ऊर्फ स्वामी असिमानंद, दिवंगत सुनील जोशी, रामचंद्र कलसंगरा, संदीप डांगे (दोघेही फरार), लोकेशकुमार, कमल चौहान,अमित आणि राजेंद्र चौधरी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)