डाव्यांचा गडच भाजपाकडे, अंतर्गत लाथाळ्यांनी ग्रस्त काँग्रेस संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:48 AM2018-03-04T00:48:02+5:302018-03-04T00:48:02+5:30
सलग २५ वर्षे असलेले सरकार, त्यातून सरकारविषयीची नाराजी, काँग्रेसचे अस्तित्वच संपणे व भाजपाच्या रूपाने मिळालेला पर्याय यामुळेच त्रिपुरामध्ये कम्युनिस्टांची सत्तेला मोठा धक्का बसला. तो धक्का इतका मोठा की, त्यात डाव्या पक्षांना ५९ पैकी जेमतेम १६ जागांवर विजय मिळवता आला आणि पाच वर्षांपूर्वी एकही जागा जिंकता न आलेल्या भाजपा व मित्रपक्षांनी तब्बल ४३ जागांवर विजय मिळवला.
आगरतळा : सलग २५ वर्षे असलेले सरकार, त्यातून सरकारविषयीची नाराजी, काँग्रेसचे अस्तित्वच संपणे व भाजपाच्या रूपाने मिळालेला पर्याय यामुळेच त्रिपुरामध्ये कम्युनिस्टांची सत्तेला मोठा धक्का बसला. तो धक्का इतका मोठा की, त्यात डाव्या पक्षांना ५९ पैकी जेमतेम १६ जागांवर विजय मिळवता आला आणि पाच वर्षांपूर्वी एकही जागा जिंकता न आलेल्या भाजपा व मित्रपक्षांनी तब्बल ४३ जागांवर विजय मिळवला.
आतापर्यंत भाजपा सातत्याने काँग्रेसचा पराभव करीत आली. अनेक राज्यांत काँग्रेसला भाजपाने पराभूत केले. पण त्रिपुरामध्ये भाजपाने कम्युनिस्ट राजवटीलाच सुरुंग लावला. केरळमध्ये डाव्यांना पर्याय होती काँग्रेस आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच डाव्यांना पराभूत करू शकली होती. पण डावे विरुद्ध भाजपा असा थेट सामना होऊ न त्यात डाव्यांचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे उद्या केरळमध्ये काँग्रेसने आपली सारी ताकद न लावल्यास तिथेही डाव्यांना भाजपाच पर्याय ठरल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्रिपुरात डाव्यांचा पराभव होण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे तिथे सलग २५ वर्षे कम्युनिस्टांची सत्ता होती. त्यापैकी २0 वर्षे माणिक सरकार हेच मुख्यमंत्री होते. तिथे पक्षाची व माणिक सरकार यांची प्रतिमा चांगली असली तरी २५ वर्षांनंतर मतदारही कंटाळतात. त्यांना बदल हवाच असतो. काँग्रेसने त्या राज्याकडे २५ वर्षांत लक्षच दिले नाही आणि परिणामी पक्ष खंगत गेला.
मात्र २0१४ साली केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपाने ईशान्येकडील सर्वच राज्यांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तिथे अन्य राज्यांतून अनेक संघटक पाठवले, पंतप्रधानांपासून भाजपाध्यक्षांपर्यंत साºयांनी त्या राज्याचे दौरे केले, अनेक केंद्रीय नेत्यांनी त्रिपुरास भेटी देणे सुरू केले. काँग्रेस खंगत चालल्याचा संपूर्ण फायदा भाजपाने उचलला. सुनील देवधरसारखा एक मराठी कार्यकर्ता त्रिपुरामध्ये अनेक वर्षे मांड ठोकून होता. तो तेथील भाषा शिकला, प्रत्येक गावात फिरला, तिथे संघाच्या शाखा सुरू करतानाच, भाजपाची वाढ व्हावी, यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्रिपुरातील विजयानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सुनील देवधर यांचा उल्लेख केला तो यांमुळेच.
हे सारे होत असताना प्रदेश काँग्रेसमध्ये लाथाळ्या सुरू होत्या आणि आपल्याला इथे कोणीच पर्याय नाही, अशा अविर्भावात डावे, त्यातही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते वावरू लागले होते. सत्तेत सतत असल्याचे अनेक तोटे असतात, हे डाव्यांनी लक्षातच घेतले नाही. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर आपण तगून राहू, हा फाजिल आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला होता. भाजपा खेडेगावांमध्ये पाय रोवत आहे, आपल्याच केडरमधील काही जण भाजपाकडे वळू लागले आहेत, हे मार्क्सवाद्यांच्या लक्षात आले नाही वा त्याचे महत्त्व त्यांना जाणवले नाही.
- काँग्रेस त्रिपुरामध्ये इतकी खचून गेली आहे आणि तिच्या जागी भाजपा पर्याय म्हणून उभी राहत आहे, याचे भानच मार्क्सवाद्यांना आले नाही. आताही पराभवानंतर केरळ व पश्चिम बंगालमध्ये भाजपाला कधीच विजय मिळणार नाही, असे सीताराम येचुरी म्हणाले आहेत. भाजपाचे काय होईल ते होवो, पण स्वत:चे अस्तित्व टिकून राहण्यासाठी डाव्यांनी प्रयत्न करायला हवा. विशेषत: काँग्रेस खंगत असताना, भाजपा आपल्यापुढे पर्याय ठरू शकतो, याचा विचार डाव्यांनी करायलाच हवा.