शहीद अंकितचं 7 महिन्यांपूर्वी झालेलं लग्न; पत्नी 5 महिन्यांची गर्भवती, अंत्यसंस्काराला मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 10:30 AM2023-08-22T10:30:37+5:302023-08-22T10:37:51+5:30
अंकितला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते.
हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील गड्डी खेडी गावचा रहिवासी असलेला अंकित, लडाखमधील लेह येथे लष्कराचे वाहन दरीत पडल्याने शहीद झालेल्या 9 जवानांमध्ये होता. त्याला सन्मानाने अखेरचा निरोप देण्यात आला. अंकितचे पार्थिव घेऊन आलेल्या लष्कराच्या जवानांनी शोक व्यक्त केला. पण शहीद होण्याचा अभिमान भाग्यवानांना मिळतो आणि आपल्या जोडीदाराने देशासाठी बलिदान दिल्याचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले.
अनेक राजकीय लोकांनीही शहीद अंकितच्या पार्थिवावर पुष्प अर्पण केले आणि या शूर सुपुत्राला नमन केले.अंकितला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते आणि यावेळी शहीद जवानासमोर नतमस्तक होण्यासाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील अनेकजण आले होते. अंकित कुंडू 4 वर्षांपूर्वी सैन्यात दाखल झाला होता आणि सध्या तो लडाखमध्ये तैनात होता.
अंकितचे लग्न प्रीतीशी या वर्षी फेब्रुवारीमध्ये झाले होते आणि ती 5 महिन्यांची गर्भवती देखील आहे. फेब्रुवारीमध्ये लग्न झाल्यानंतर मार्चमध्ये अंकित पुन्हा ड्युटीवर गेला आणि त्याची पत्नी गरोदर असल्याचे त्याला समजले. मुलाच्या जन्मानंतरच गावी येईन, असं त्याने पत्नीला सांगितलं होतं. अचानक झालेल्या या घटनेने प्रीती आणि अंकितच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
अंकितच्या वडिलांचेही तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. धाकटा भाऊ शेतीचे काम करतो आणि आता अंकित शहीद झाल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंकितचे पार्थिव मूळ गावी गड्डी खेडी येथे पोहोचले. ही माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने त्याला अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचले. भारत मातेच्या जयघोषात नमन केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.