देशात १२ हजारांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण; आतापर्यंत २३ लाख लोकांना दिली लस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 06:44 AM2021-01-29T06:44:26+5:302021-01-29T06:44:39+5:30
गुरुवारी १४,३०१ जण या संसर्गातून बरे झाले. देशभरात आतापर्यंत २३,५५,९७९ लोकांना कोरोना लस देण्यात आली
नवी दिल्ली : देशामध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. गुरुवारी देशात बारा हजारांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण सापडले. एक कोटी तीन लाखांपेक्षा अधिक लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९६.९४ टक्के आहे. बळींची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०७०,११,१९३ झाली असून, त्यातील १,०३,७३,६०६ जण बरे झाले आहेत. गुरुवारी कोरोनामुळे १२३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या १,५३,८४७ झाली आहे. सध्या १,७३,७४० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांचे प्रमाण १.६२ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४४ टक्के आहे. गुरुवारी १४,३०१ जण या संसर्गातून बरे झाले. देशभरात आतापर्यंत २३,५५,९७९ लोकांना कोरोना लस देण्यात आली. जगभरात कोरोनाचे १० कोटी १४ लाख रुग्ण आहेत. त्यातील सात कोटी ३३ लाख रुग्ण बरे झाले. जगात कोरोनामुळे २१ लाख ८४ हजार लोकांचा बळी गेला.