हा एक धडा आहे, युवकांसाठी... खासदार अमरसिंहाच्या फोटोसह मेसेज व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 09:33 AM2020-03-01T09:33:56+5:302020-03-01T09:34:58+5:30
राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी ट्विट करत अमिताभ बच्चन आणि त्यांच्या
मुंबई - समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार अमरसिंह हे सध्या सिंगापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर किडनीरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट रुग्णालयातूनच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची माफी मागितली होती. त्यानंतर, आता त्यांचा रुग्णालयातील फोटो आणि त्यासह एक संदेश व्हायरल होत आहे. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महत्वकांक्षी तरुणांना उद्देशून हा संदेश लिहिला आहे.
राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी ट्विट करत अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात केलेल्या जुन्या विधानांवर माफी मागितली होती. सिंह यांनी एक ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 18 फेब्रुवारीला अमर सिंह यांचे वडील हरिश्चंद्र सिंह यांची पुण्यतिथी होती. त्याचदरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांना मेसेज पाठवला. त्यावर अमर सिंह ट्विट करत म्हणाले, आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे. त्यासंदर्भात अमिताभ बच्चन यांचा मला संदेश मिळाला. जेव्हा मी जीवन आणि मृत्यूदरम्यान संघर्ष करत आहे, त्या वेळी मी अमिताभजी आणि त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात केलेल्या टीकात्मक विधानांवर माफी मागतो. ईश्वर त्या सगळ्यांना आशीर्वाद देवो. त्यानंतर, आता अमरसिंह यांचा रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, या फोटोसह एक मेसेजही लिहिला आहे.
''हे आहेत अमर सिंह, समाजवादी पक्षाचे भूतपूर्व महासचिव, एकेकाळी सत्तेच्या वर्तुळात अमर सिंह यांचा चांगलाच दबदबा होता, अनिल अंबानीसारखे उद्योगपती व अमिताभ बच्चन यांच्यासारखे बॉलिवूडचे स्टार यांच्या सोबत अमर सिंह यांनी नेहमी उठबस असायची, समाजवादी पार्टी ही मुलायमसिंग यादव यांच्या पेक्षा अमर सिंह यांच्या विचाराने जास्त चालायची..
तर हेच अमर सिंह आता आपल्या जीवन-मृत्युची लढाई लढत आहेत पण आता त्यांच्यासोबत कोणीच नाहीये ना पक्ष, ना उद्योगपती ना कलाकार.. हा एक धडा आहे राजकारणाचे अवाजवी आकर्षण असणाऱ्या युवकांसाठी, ज्यांना वाटते की राजकारणात/राजकीय पक्षात एखादे पद मिळाले म्हणजे जीवनच सार्थक झालं, राजकारणात काही काळ एखाद्याची चलती राहू शकते पण जेंव्हा भर ओसारतो तेंव्हा ढुंकून सुद्धा कोणी विचारात नाही...''
दरम्यान, अमरसिंह यांनी भावुक होऊन अमिताभ यांची माफी मागितली आहे.