धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, नोटाबंदीवरील धडे वगळले, ‘सीबीएसई’पाठ्यक्रमांना कात्रीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 04:43 AM2020-07-09T04:43:18+5:302020-07-09T04:43:39+5:30

यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे सुरुवातीचे तीन महिने कोरोना महामारीमुळे वाया गेल्यामुळे उरलेल्या वेळात विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी विविध विषयांच्या पाठ्यक्रमांची त्याअनुरूप फेररचना करून सुमारे ३० टक्के अभ्यास कमी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी मंगळवारी जाहीर केले होते.

Lessons on secularism, citizenship, denomination omitted, scissors effect on CBSE courses | धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, नोटाबंदीवरील धडे वगळले, ‘सीबीएसई’पाठ्यक्रमांना कात्रीचा परिणाम

धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, नोटाबंदीवरील धडे वगळले, ‘सीबीएसई’पाठ्यक्रमांना कात्रीचा परिणाम

Next

नवी दिल्ली : इयत्ता ९ वी ते १२ वीच्या वर्गांच्या पाठ्यक्रमांना कात्री लावताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, नोटाबंदी व लोकशाही हक्क यासह इतरही अनेक बाबींवरचे धडे पाठ्यपुस्तकांतून वगळले आहेत.

यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे सुरुवातीचे तीन महिने कोरोना महामारीमुळे वाया गेल्यामुळे उरलेल्या वेळात विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी विविध विषयांच्या पाठ्यक्रमांची त्याअनुरूप फेररचना करून सुमारे ३० टक्के अभ्यास कमी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी मंगळवारी जाहीर केले होते. त्यानुसार नेमक्या कोणत्या इयत्तेचा अभ्यासक्रम कशा प्रकारे कमी करण्यात आला आहे, याचा तपशील ‘सीबीएसई’ने बुधवारी जाहीर केला. पाठ्यक्रमातील हा बदल फक्त यंदापुरताच लागू असेल, असे मंडळाने स्पष्ट केले.

मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वगळलेले धडे वर्गात न शिकविता गरज असेल तेवढाच त्यांचा संदर्भ देण्यात यावा. वर्षभरात शाळांमध्ये घेतल्या जाणाºया परीक्षा किंवा वर्षअखेरीस मंडळातर्फे घेतल्या जाणाºया परीक्षेत या वगळलेल्या भागांवर प्रश्न विचारण्यात येणार नाहीत, असे शाळाप्रमुख व शिक्षकांना कळविण्यात आले आहे.

शिक्षणातील ज्ञानार्जनाचे महत्त्व लक्षात घेता पाठ्यक्रम कमी केला तरी विषयांमधील मूलभूत संकल्पना कायम ठेवण्याची काळजी घेण्यात आल्याचे मंत्री म्हणाले होते. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचे कारण देऊन पाठ्यक्रमाचा फेरआढावा घेताना या सरकारच्या काळात ज्या मुद्यांवरून आंदोलने व वाद झाले, असेच विषय नेमके वगळले जावेत, यावरून अनेकांच्या भुवया साहजिकच उंचावल्या आहेत. मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या पाठ्यक्रम कपातीच्या संदर्भात शिक्षणतज्ज्ञांनी म्हणे एक आठवड्यात दीड हजाराहून जास्त सूचना व शिफारशी पाठविल्या होत्या. मात्र, नेमके हेच धडे वगळण्याच्या सूचना कोणाच्या होत्या, हे मात्र कळायला मार्ग नाही.

नेमके काय वगळले
इयत्ता १० वी : लोकशाही आणि विविधता, लैंगिक समता, धर्म व जात, लोकचळवळी व आंदोलने आणि लोकशाहीपुढील आव्हाने.

इयत्ता ११ वी : संघराज्य व्यवस्था, नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता व स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व आ़णि विकास.

इयत्ता १२ वी : पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका व नेपाळ या
शेजारी देशांशी भारताचे संबंध, भारताच्या आर्थिक
विकासातील परिवर्तने, भारतातील सामाजिक चळवळी आणि नोटाबंदी.

विविध विषयांच्या
पाठ्यक्रमांची त्याअनुरूप फेररचना करून सुमारे ३० टक्के अभ्यास कमी करण्यात येणार

पाठ्यक्रमाची फेररचना करण्याच्या नावाखाली संघराज्य व्यवस्था, धर्म निरपेक्षता व नागरिकत्व यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरील धडे वगळण्याचा ‘सीबीएसई’च्या निर्णयास आमचा जोरदार आक्षेप आहे. काही झाले तरी हे धडे अभ्यासक्रमात राहतील, याची केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने खात्री करावी.
-ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल

Web Title: Lessons on secularism, citizenship, denomination omitted, scissors effect on CBSE courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.