तृतीयपंथीय नृत्यांगना नटराज यांच्यावर धडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:08 AM2018-06-11T05:08:51+5:302018-06-11T05:08:51+5:30
तृतीयपंथी असा शब्द उच्चारला की, अनेकांच्या मनात पहिली भावना येते ती घृणेची; परंतु तृतीयपंथी हेदेखील आपल्यासारखेच माणूस आहेत व त्यांनाही समाजातील इतर घटकांप्रमाणेच समानतेची वागणूक दिली पाहिजे
चेन्नई - तृतीयपंथी असा शब्द उच्चारला की, अनेकांच्या मनात पहिली भावना येते ती घृणेची; परंतु तृतीयपंथी हेदेखील आपल्यासारखेच माणूस आहेत व त्यांनाही समाजातील इतर घटकांप्रमाणेच समानतेची वागणूक दिली पाहिजे, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी प्रख्यात भरतनाट्यम नृत्यांगना नटराज यांच्या जीवनावरील धडा तामिळनाडूतील इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.
यासंदर्भात शिक्षण विभागाचे मुख्य सचिव (अभ्यासक्रम विकास) टी. उदयचंद्रन यांनी सांगितले की, तामिळनाडूतील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्येही भविष्यात भरघोस यश मिळवावे, अशी सरकारची इच्छा आहे. त्यादृष्टीनेही पाठ्यपुस्तकांतील धड्यांची आखणी करण्यात येत आहे.
अकरावीच्या पुस्तकामध्ये संगीतकार इलयाराजा व आॅस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी त्यांच्या क्षेत्राला जे योगदान दिले, त्यावरील धड्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
तृतीयपंथीय असूनही निराश न होता नृत्यांगना नटराज हिने भरतनाट्यमध्ये विलक्षण प्रावीण्य मिळविले. नटराज जेव्हा अमेरिकेमध्ये नृत्याचा कार्यक्रम करण्यासाठी आली तेव्हा तिला ज्या कठीण प्रसंगातून सामोरे जावे लागले त्याचे वर्णन या धड्यात आहे. तिने सादर केलेल्या पहिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेनंतर तृतीयपंथीय नर्तक व नृत्यांगनांकडे बघण्याची कार्यक्रम आयोजक व सामान्य लोकांची दृष्टी बदलली. ती अधिक सकारात्मक झाली. वर्तमानपत्रे किंवा नियतकालिकांमध्ये एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या कामगिरीचा परिचय देणारा लेख जसा येतो, अगदी त्याच स्वरूपात या धड्याचे लेखन केलेले आहे.
नटराज यांच्यावरील धड्यासंदर्भात बोलताना टी. उदयचंद्रन यांनी सांगितले की, तामिळनाडूतील महान व्यक्तींच्या विविध मोलाच्या कामगिरीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, म्हणून सामाजिकशास्त्राच्या पुस्तकांमध्ये या व्यक्तींवरील धडे समाविष्ट करण्यात आले आहेत.
मनात जिद्द असेल व अंगात कलागुण असतील तर सर्व आर्थिक, सामाजिक अडथळ््यांवर मात करून यश नक्कीच मिळविता येते याचे आदर्श उदाहरणच संगीतकार इलयाराजा व ए. आर. रेहमान यांनी घालून दिले आहे.