टीम इंडियाची घोषणा लवकर करा, प्रशासकीय समितीने BCCI ला फटकारलं
By admin | Published: May 4, 2017 05:15 PM2017-05-04T17:15:47+5:302017-05-04T17:15:47+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची लवकरात लवकर घोषणा करा अशी सुचना प्रशाकीय समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची लवकरात लवकर घोषणा करा अशी सुचना प्रशाकीय समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केली आहे. 1 जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात होणार आहे. त्यासाठी संघ जाहीर करण्याची 25 एप्रिल अंतिम तारीख होती. सर्व देशांनी ठरावीक वेळेत संघ जाहीर केले मात्र, बीसीसीआयने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये महसुलाच्या वाटपावरून वाद सुरू आहे.
येत्या रविवारी (दि.7) बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैठकीत आयसीसीचा निषेध म्हणून बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशाकीय समितीने बैठक होण्याआधीच बीसीसीआयला संघ जाहीर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
प्रशासकीय समितीने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये, भारतीय संघाने स्पर्धेची पूर्वतयारी सुरू करायला हवी. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा गतविजेता आहे त्यामुळे विजेतेपद कायम ठेवण्यासाठीचा प्रबळ दावेदार आहे. 1 जूनपासून सुरू होणा-या या स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्याची 25 एप्रिल अंतिम तारीख होती. तरीही बीसीसीआयने अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे बीसीसीआयने लवकरात लवकर संघ जाहीर करावा.” असं म्हटलं आहे.
यापुर्वी, बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत घेतले जाणारे निर्णय भारतीय क्रिकेटला मारक ठरणारे असतील तर प्रशासकीय समितीने सर्वोच्च न्यायालयात जाईल असा इशारा याआधीच समितीने बीसीसीआयला दिला आहे.