पुरुष कर्मचा-यांनाही द्या बाल संगोपन रजा- महिला आयोग
By admin | Published: March 9, 2017 10:41 PM2017-03-09T22:41:08+5:302017-03-09T22:41:08+5:30
महिला कर्मचा-यांसारख्याच पुरुष कर्मचा-यांनाही बाल संगोपन रजा द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्र सरकारकडे केली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - महिला कर्मचा-यांसारख्याच पुरुष कर्मचा-यांनाही बाल संगोपन रजा द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्र सरकारकडे केली आहे. महिला आयोगाच्या मते, मुलांच्या संगोपनाची जबाबदारी महिलांएवढी पुरुषांचीसुद्धा आहे. त्यामुळे त्यांनाही 2 वर्षांची बाल संगोपन रजा मिळावी, असं महिला आयोगानं सांगितलं आहे. पुरुषांना बाल संगोपन रजा ही खासगी कंपन्यांमध्येही देण्यात यावी, पुरुषांसाठी काही काळासाठी या रजा घेणं गरजेचं असलं पाहिजे, सर्वच कामाच्या ठिकाणी क्रेश सुविधा उपलब्ध करून दिली जावी.
स्त्री-पुरुष संबंधांच्या बदलत्या स्वरूपात महिला आयोगाच्या या मागणीला महत्त्व प्राप्त झालं आहे. ब-याचशा मल्टिनॅशनल कंपन्या महिला कर्मचा-यांसारख्याच समान रजा पुरुष कर्मचा-यांनासुद्धा देतात. महिलांप्रमाणे पुरुषांनीही बाळाच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडल्यास खरोखरच एक सशक्त समाज निर्माण झाल्यावाचून राहणार नाही.
(महिला आयोग वाढविणार मुलींचे मनोधैर्य)
कोपर्डी घटनेनंतर खचलेल्या महिला आणि मुलींचे मनोधैर्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रयत्नशील आहेत आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी कोपर्डीच्या भैरवनाथ मंदिरात सर्व शाळा, महाविद्यालयातील मुली, पालक व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला होता. एकंदरितच महिला आयोग दिवसेंदिवस प्रगल्भ होत असून, महिलांप्रमाणेच पुरुषांच्या हक्कासाठीही पुढे येतोय.