...तर इच्छामरण द्या; अवघ्या 2 हजारांची मदत मिळालेल्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 10:19 AM2019-03-19T10:19:00+5:302019-03-19T10:26:58+5:30
प्रधानमंत्री किसान निधीतून मिळालेली 2 हजारांची मदत मुख्यमंत्र्यांना पाठवली
लखनऊ: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून अवघ्या दोन हजारांची मदत मिळालेल्या शेतकऱ्यानं इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. आग्र्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यानं त्याला मिळालेली तुटपुंजी मदत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवून दिली. मदत देता येत नसेल, तर इच्छामरण द्या, असं पत्र या शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.
39 वर्षीय बटाटा उत्पादक शेतकरी प्रदीप शर्मा यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून मिळालेली 2 हजारांची तुटपुंजी रक्कम योगी आदित्यनाथ यांना पाठवून दिली. 'तुम्ही माझी मदत करू शकत नसाल, तर किमान इच्छामरणाची परवानगी द्या,' असं शर्मा यांनी पत्रात म्हटलं आहे. आपल्या डोक्यावर 35 लाखांचं कर्ज असल्याचं शर्मा यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. 'प्रचंड कर्ज, सरकारकडून मिळालेली अपुरी मदत यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण आहे. आमच्याकडे स्वत:चं घर नाही. त्यामुळे आम्हाला भाड्यानं रहावं लागतं. 2016 मध्ये माझ्या पिकाचं नुकसान झालं. त्याची भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिलं. राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र मदत मिळाली नाही,' अशी माहिती शर्मांनी दिली.
गेल्या डिसेंबरमध्ये दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. मात्र तरीही रिकाम्या हातानं परतावं लागल्याचं हताश झालेल्या शर्मांनी सांगितलं. 2015 मध्ये कर्जाच्या ओझ्याला कंटाळून माझ्या काकांनी आत्महत्या केली. त्यावेळीदेखील मी या प्रकरणाचं गांभीर्य प्रशासनाच्या कानावर घातलं. मात्र अधिकाऱ्यांनी काहीच केलं नाही, अशी व्यथा त्यांनी बोलून दाखवली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नाशिकच्या निफाडमधील संजय साठेंनी कांद्याला अतिशय कमी भाव मिळाल्यानं विक्रीतून झालेली कमाई पंतप्रधान मोदींनी पाठवली होती. साठे यांनी 750 किलो कांदा विकला होता. त्यातून त्यांना अवघे 1 हजार 64 रुपये मिळाले होते.