मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्या: काँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 07:19 AM2018-05-15T07:19:21+5:302018-05-15T07:19:21+5:30
मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्यावी, असे साकडे काँग्रेस पक्षाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना घातले आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पदाचा दुरुपयोग करून राजकीय आणि व्यक्तिगत हिशेब चुकते करण्यासाठी विरोधीपक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना संपविण्याची वक्तव्ये जाहीरपणे करीत आहेत, अशी तक्रार करत मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्यावी, असे साकडे काँग्रेस पक्षाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना घातले आहे.
कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी पंतप्रधानपदाला न शोभणारी भाषा वापरल्याचे राष्ट्रपतींना रविवारी पाठविलेले पत्र काँग्रेसने सोमवारी प्रसिद्ध केले. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे व आत्तापर्यंत त्याने अनेक आव्हाने व धमक्या पचविल्या आहेत. अशा धमक्यांना काँग्रेसचे नेतृत्व नेहमीच धीराने व निर्भयतेने सामोरे गेले आहे. त्यामुळे मोदींच्या धमक्यांपुढेही काँग्रेस पक्ष किंवा त्याचे नेते जराही नमणार नाही, असे या पत्रात ठामपणे नमूद करण्यात आले आहे.
मोदी यांनी काँग्रेस नेतृत्वास दिलेली धमकी सर्वस्वी निषेधार्ह आहे. १३० कोटी लोकांच्या व राज्यघटनेनुसार शासन चालणाऱ्या भारतासारख्या (पान ५ वर)(पान १ वरून) लोकशाही देशाच्या पंतप्रधानाच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने जाहीरपणे किंवा खासगीतही अशी वक्तव्ये करणे हे पूर्णपणे अस्वीकारार्ह वर्तन आहे. मुद्दाम अपमानित करण्याच्या आणि शांतता भंग व्हावा या इराद्याने मोदींनी ही धमकावणीची भाषा वापरली आहे, याकडे राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यात आले.
राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे देशाच्या शासनव्यवस्थेचे सर्वोच्च प्रमुख असतात. त्यामुळे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळास सल्ला देणे व मार्गदर्शन करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते, असे नमूद करून काँग्रेसने राष्ट्रपतींना विनंती केली की त्यांनी काँग्रेस अथवा अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्यांबद्दल किंवा अन्य कोणाही व्यक्तीविषयी अशी धमकावणीची भाषा व वापरण्याची मोदींना समज द्यावी.
मोदींनी पातळी सोडली तरी पंतप्रधानपदाला कमीपणा येईल, अशी त्यांच्याविषयी वक्तव्ये आम्ही कधीच करणार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार सांगत आले आहेत. कर्नाटकच्या प्रचारात मोदींनी विधिनिषेध सोडल्याने प्रचार संपताच काँग्रेसने त्यांच्याविषयीचे गाºहाणे राष्ट्रपतींकडे मांडले आहे.
>मर्यादा सोडणे ही काँग्रेसचीच संस्कृती
भाजपाने लगेच पलटवार करून मर्यादा सोडून बेलगाम वक्तव्ये करणे ही काँग्रेसची संस्कृतीच असल्याचा आरोप करत सन २००९ पासून काँग्रेसच्या विविध नेत्यांनी केलेल्या विधानांची जंत्रीच जाहीर केली. त्यात काँग्रेस नेत्यांनी मोदींना गंदी नाले का कीडा, गंगू तेली, पागल कुत्ता, भस्मासूर, रावण, बंदर व उंदीर म्हटल्याचा उल्लेख आहे. सोनिया गांधी यांनी मोदींना ‘मौत का सौदागर’ व ‘जहर की केती करनेवाला’ म्हटल्याचेही भाजपाने स्मरण दिले. भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन म्हमाले की, ज्यांनी शालीन भाषेची मर्यादा सोडण्याचा विक्रम केला आहे तेच मोदींवर बोट उगारत आहेत. पण दुसºयाकडे बोट दाखविताना चार बोटे स्वत:कडे असतात याचे त्यांनी भान ठेवावे. कर्नाटकमधील पराभव स्पष्ट दिसत असल्याने काँग्रेस तोंड लपविण्यासाठी काही तरी निमित्त शोधत आहे.
>काय म्हणाले होते मोदी? : हुबळी येथील प्रचारसभेत मोदी म्हणाले होते, ‘काँग्रेस के नेता कान खोलकर सुन लीजिये. अगर सीमाओंको पार करेंगे, तो ये मोदी है. लेने के देने पड जायेंगे...’ . काँग्रेसने पत्रात मोदींची ही धमकी शब्दश: उद््धृत करून मोदींच्या त्या भाषणाचा यूट्युबवरचा व्हिडीओही राष्ट्रपतींना सादर केला.
>काय आहे पत्रात?
पंतप्रधान हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे. त्या पदाची शपथ या जबाबदारीची स्पष्ट जाणीव करून देते. भूतकाळात भारताच्या सर्व पंतप्रधनांनी सार्वजनिक वा खासगीतही आपले वर्तन उच्च पदाला साजेसे ठेवले आहे. त्यामुळे या पदावर असलेली व्यक्ती मुख्य विरोधी पक्षाच्या नेत्यांना उघडपणे धमकावणीची भाषा करेल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. पण मोदींनी मर्यादा सोडून नेमके हेच केले आणि पदाच्या शपथेचा भंग केला आहे.
>या नेत्यांच्या स्वाक्षºया
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खारगे, माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम, अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, कर्णसिंग, आनंद शर्मा, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी व मुकुल वासनिक इत्यादी काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठविले गेले.
>त्यांचे वागणे पंतप्रधानपदाला बट्टा लावणारे
हे पत्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी टष्ट्वीटरवर म्हटले की, हा पत्राचे निमित्त कर्नाटकमधील वक्तव्याचे असले तरी मोदींचे एकूणच वागणे पदाला न शोभणारे असून ते आपल्या वागण्याने पंतप्रधानपदाला सातत्याने बट्टा लावत आले आहेत.