RSS स्वयंसेवकांना शस्त्र बाळगण्याची परवनागी द्या, भाजपा नेत्याची मागणी
By admin | Published: October 18, 2016 12:51 PM2016-10-18T12:51:21+5:302016-10-18T13:30:42+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपा ज्येष्ठ नेते एस सुरेश कुमार यांनी केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 18 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपा ज्येष्ठ नेते एस सुरेश कुमार यांनी केली आहे. आरएसएस स्वयंसेवक रुद्रेशच्या हत्येविरोधात शिवाजीनगर परिसरात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना एस सुरेश कुमार यांनी 'जर आरएसएस स्वयंसेवकांना सुरक्षा देणं पोलिसांना जमत नसेल तर त्यांनी स्वयंसेवकांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी,' अशी मागणी केली आहे.
'आरएसएस स्वयंसेवक कुट्टप्पा, प्रवीण पुजारी, राजू आणि रुद्रेश यांच्या झालेल्या हत्यांवरुन पोलीस आपल्याला सुरक्षा देण्यात असक्षम आहेत हे सिद्ध होत आहे,' असं एस सुरेश कुमार बोलले आहेत. 'आम्ही पोलीस आयुक्तांकडे सुरक्षेसाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी केल्याचंही,' त्यांनी सांगितलं आहे.
या वक्तव्यावर प्रसारमाध्यमांनी स्पष्टीकरण मागितल्यानंतर 'आम्ही पीडित नसून योद्धे आहोत. आपली सुरक्षा कशी करावी आम्हाला माहित आहे,' असं उत्तर एस सुरेश कुमार यांनी दिलं. आरएसएस आणि ज्येष्ठ भाजपा नेत्यांनी मात्र या वक्तव्याला पाठिंबा दिलेला नाही.
आरोपींविरोधात कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप एस सुरेश कुमार यांनी केला आहे. 'तर हा सगळा कट असल्याचं,' ज्येष्ठ भाजपा नेत्या शोभा यांनी म्हटलं आहे. एस सुरेश कुमार यांच्या वक्तव्याशी फारकत घेत आरएसएसने आम्हाला पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं म्हटलं आहे. न्याय मिळवण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करु असंही आरएसएसने सांगितलं आहे.