अयोध्येत वादग्रस्त जागेवर मंदिर बांधू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:37 AM2017-08-09T01:37:42+5:302017-08-09T01:37:46+5:30
अयोध्येतील रामजन्मभूमीच्या वादग्रस्त जागेवर भगवान श्रीरामाचे मंदिर बांधावे आणि तेथून काही अंतरावर मुस्लीम बहुसंख्य वस्तीत मशीद बांधावी, असा तडजोडीचा प्रस्ताव उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमीच्या वादग्रस्त जागेवर भगवान श्रीरामाचे मंदिर बांधावे आणि तेथून काही अंतरावर मुस्लीम बहुसंख्य वस्तीत मशीद बांधावी, असा तडजोडीचा प्रस्ताव उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
डिसेंबर १९९२ मध्ये कारसेवकांनी उद््ध्वस्त करण्यापूर्वी ज्या जागी बाबरी मशीद उभी होती ते भगवान श्रीरामाचे जन्मस्थान असल्याने तेथे राम मंदिर बांधण्यासाठी ती जागा आम्हाला मिळायला हवी, असा हिंदूंचा दावा आहे. या वादग्रस्त जागेची तीन भागांत वाटणी करण्याचा निवाडा अलाहाबाद उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी दिला होता. त्याविरुद्धची अपिले येत्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस यायची आहेत.
गेली ७० हून अधिक वर्षे या वादात मुस्लीम समाजाचे प्रतिनिधित्व उत्तर प्रदेशचे सुन्नी वक्फ बोर्ड करत आले आहे. मात्र आता शिया वक्फ बोर्डही या वादात प्रतिवादी म्हणून उतरले आहे. मुळात पाडली गेलेली बाबरी मशिद ही शिया पंथियांची मशीद होती. त्यामुळे वादग्रस्त जागा आमची आहे व सुन्नी वक्फ बोर्डाचा त्या जागेशी काही संबंध नाही, असा दावा शिया बोर्डाने केला आहे.
शिया वक्फ बोर्डाची भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र त्यांचे अध्यक्ष वासीम रिझवी यांनी केले आहे. त्यात या बोर्डाने हा वाद शांततेने व आपसात तडजोडीने मिटविण्याची तयारी दर्शविली आहे. त्या संदर्भात बोर्ड म्हणते की, वादग्रस्त जागा आमची असल्याने इतर पक्षकारांच्या संमतीने कसा तोडगा काढावा, हे ठरविण्याचा फक्त आम्हालाच अधिकार आहे. सुन्नी बोर्डाचा याच्याशी काहीही संबंध नाही व ते या तडजोडीस विरोधही करू शकत नाहीत.
तडजोडीचा ढोबल प्रस्ताव मांडताना शिया वक्फ बोर्ड म्हणते की, वादग्रस्त जागा हे श्री रामलल्लाचे जन्मस्थान असल्याची हिंदूंची श्रद्धा असल्याने त्याजागी श्रीरामाचे मंदिर बांधले जाण्यास आमची हरकत नाही. पाडल्या गेलेल्या मशिदीच्या बदल्यात मूळ जागेपासून काही अंतरावर मुस्लीम बहुसंख्य वस्तीमध्ये नवी मशिद बांधली जावी.
पुरेसे अंतर हवे
मात्र मंदिर आणि मशीद या दोन्ही ठिकाणी लावल्या जाणाऱ्या ध्वनिक्षेपकांमुळे परस्परांच्या धार्मिक कार्यात व्यत्यय येऊ नये यासाठी या दोन्हींमध्ये पुरेसे अंतर असावे, असेही शिया वक्फ बोर्डाने सुचविले आहे.