आम्हालाही 'अच्छे दिन' येऊ द्या!
By admin | Published: December 29, 2015 08:39 AM2015-12-29T08:39:51+5:302015-12-29T08:52:28+5:30
नानाविध कारणांनी प्रसारमाध्यमांतून टिका-टिप्पणीची संवय असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपल्याच परिवारातील कुरबुरींमुळे वाईट प्रसिद्धीला तोंड द्यावे लागणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - नानाविध कारणांनी प्रसारमाध्यमांतून होणार्या टिका-टिप्पणीची संवय असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपल्याच परिवारातील कुरबुरींमुळे वाईट प्रसिद्धीला तोंड द्यावे लागणार आहे. संघाच्या 'ऑर्गनायझर' आणि 'पान्चजन्य' या दोन मुखपत्रांमधील कर्मचार्यांनी पगार आणि कार्यालयीन कामाच्या बाबतीत होत असलेल्या अन्यायाबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून 'आम्हालाही अच्छे दिन येऊ द्या की', असे साकडे घातले आहे.
संघाच्या या इंग्रजी आणि हिंदी मुखपत्रांचे प्रकाशन 'भारत प्रकाशन (दिल्ली) लि.' या संघ परिवारातील कंपनीकडून केले जाते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता आल्यानंतर या कंपनीच्या व्यवस्थापनातही बदल झाले व व्यवस्थापकीय संचालक परमानंद मोहरिया यांच्या धुरिधत्वाने कंपनीचा कारभार सुरु झाला.
या नव्या व्यवस्थापनाने अन्याय्य आणि पक्षपाती धोरण स्वीकारल्याने या प्रशासन संस्थेतील वातावरण कलुषित झाले असल्याने भागवत यांनी यात लक्ष घालावे, अशी विनंती या मुखपत्रांच्या कर्मचार्यांनी केली आहे. २0 कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या असलेले हिंदीतील हे पत्र भागवत यांना २ डिसेंबर रोजी लहिले गेले आहे.
पत्रात हे कर्मचारी भागवत यांना लिहितात: नवी वेतनश्रेणी लागू करताना डावे-उजवे केले गेले, अनुभवी लोकांना निकम्मे ठरवून सक्तीने नवृत्त केले गेले, असलेले वेतन नीटपणे न देता लठ्ठ पगारांवर काही नवे लोक आणले गेले, अशी तक्रार करत या पत्रात चार कर्मचार्यांवर कसा अन्याय केला गेला याची उदाहरणेही दिली आहेत.
एरवी घरची धुणी चव्हाट्यावर धुण्याची संघाची संस्कृती नाही. शिवाय सूडाने कारवाई होण्याच्या भीतीने जाहीर बभ्रा न करता किंवा न्यायालयात न जाता एक कुटुंबप्रमुख या नात्याने या कर्मचार्यांनी प्राप्त परिस्थिती भागवत यांच्या कानावर घातली आहे.
अती झाले तर नाईलाजाने कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागेल, असे लिहिताना हे कर्मचारी पत्रात म्हणतात: घरात कशाची कमतरता असेल तर कुटुंबातील सर्व जण आहे त्यात भागवून घेतात. आम्हीही याच कौटुंबिक भावनेने कंपनीची आर्थिक स्थिती चांगली नव्हती तेव्हा तुटपुंजा पगारही प्रसंगी हप्त्याने घेतला व पगारवाढीसाठी कधी कुरकूर केली नाही. परिस्थितीची जाण ठेवून आम्ही संतुष्ट होतो व समाधानीही होतो. पण आता परिस्थिती तशी नाही. कंपनी नफ्यात आहे.या पत्राची प्रत सरकार्यवाह भैय्याजी जोशी, चार सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, डॉ. कृष्णगोपाळ, भागय्या व सुरेश सोनी यांच्याखेरीज अ.भा. प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनाही पाठविण्यात आली आहे.
६८ वर्षांचा इतिहास
संघाचे 'ऑर्गनायझर' हे इंग्रजी मुखपत्र साप्ताहिकाच्या स्वरूपात जुलै १९४७ मध्ये सुरु झाले.भारत प्रकाशनचे नवे व्यवस्थापन येण्याच्या काही महिने आधी म्हणजे गेल्या एप्रिलमध्ये त्याचे नियतकालिकाच्या रूपाने 'रिलॉन्च' केले गेले.
ऑर्गनायझर'नंतर काही महिन्यांनी १४ जानेवारी १९४८ रोजी 'पान्चजन्य'हे हिंदी मुखपत्र सुरु झाले. अटल बिहारी बाजपेयी त्याचे पहिले संपादक होते.