सरकारने बोलावले तर चर्चा करू - संयुक्त किसान मोर्चा; उद्या शेतकऱ्यांचा संविधान बचाओ दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 04:59 AM2021-04-13T04:59:12+5:302021-04-13T04:59:36+5:30
Kisan Morcha : संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकेत यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने चर्चेची दारे बंद केली आहेत.
- विकास झाडे
नवी दिल्ली : जानेवारीपासून केंद्र सरकारने आमच्याशी चर्चा करणे बंद केले आहे. सरकार आमची परीक्षा घेत आहे. मागण्या पूर्ण होईत्सोवर आम्ही मागे हटणार नाही. बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण देशभर शेतकरी संविधान बचाओ आणि बहुजन एकता दिवस साजरा करणार आहेत.
संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकेत यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने चर्चेची दारे बंद केली आहेत. परंतु त्यांनी आम्हाला चर्चेला बोलावले तर आम्ही चर्चा करू. मात्र, दि. २२ जानेवारी रोजी जिथे थांबलो होतो तिथूनच पुढे चर्चा सुरू होईल. पानिपतच्या बरोली येथे दि. १४ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना प्रवेश घेऊ देणार नाही. २६ नोव्हेंबर २०२० पासून पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत. १४ एप्रिलला सिंघू, टिकरी, गाझीपूर सीमांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.