विजय मल्ल्यांकडून पै - पै वसूल करू
By Admin | Published: March 18, 2016 04:07 AM2016-03-18T04:07:33+5:302016-03-18T04:07:33+5:30
हजारो कोटी रुपयांची थकीत कर्जे वसूल करण्यासाठी बँकांनी पाश आवळण्यास सुरुवात केल्यावर परदेशात निघून गेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना सरकार ‘फरार’ मानते का, याविषयी
नवी दिल्ली : हजारो कोटी रुपयांची थकीत कर्जे वसूल करण्यासाठी बँकांनी पाश आवळण्यास सुरुवात केल्यावर परदेशात निघून गेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना सरकार ‘फरार’ मानते का, याविषयी स्पष्ट भाष्य करण्याचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी टाळले. मात्र सरकारी बँका मल्ल्यांकडून थकीत कर्जांची पै न पै वसूल करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
एका कार्यक्रमात मल्ल्यांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जेटली म्हणाले की, मल्ल्या यांच्या कंपन्यांनी थकविलेल्या कर्जांची वसुली असो अथवा त्यासंबंधीचा तपास असो, प्रत्येक संस्था नेटाने काम करीत आहे. वित्तमंत्री म्हणाले की, मल्ल्यांच्या प्रकरणाची तथ्ये अगदी सुस्पष्ट आहेत. प्रत्येक सरकारी संस्था त्यांच्यावर कडक कारवाई करील. बँका त्यांच्याकडून पै न पै वसूल करतील. मल्ल्यांच्या प्रकरणाने देशाच्या बँकिंग आणि खासगी क्षेत्राचीही बदनामी झाली असल्याचे मतही जेटली यांनी व्यक्त केले. वित्तमंत्री म्हणाले की,पोलाद, वस्त्रोद्योग, महामार्ग, पायाभूत क्षेत्रातील आर्थिक मंदी पाहता सरकार अनुत्पादक संपत्तीमुळे (बुडित कर्ज)निर्माण झालेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल.
वैयक्तिक पातळीवर कर्जाची मोठी रक्कम दिली जात असून अशा रकमेची परतफेड न करता काही लोक गैरवर्तन करताना आढळून येतात. त्यांच्याकडे पुरेशी सुरक्षा ठेव नसते, ही चिंतेची बाब आहे. कायदेशीर उत्तरदायित्वाखेरीज नैतिक आणि आचारणासंबंधी मुद्देही असतात, असे सांगून जेटली यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँका बळकट होण्यासाठी सरकारला तातडीने पावले उचलण्याची गरज पाहता मी बँकांच्या पुनर्भांडवलीकरणावर भर देत आहे.
‘किंगफिशर हाऊस’चा लिलाव बारगळला
बंद पडलेल्या मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सच्या मुंबईतील ‘किंगफिशर हाऊस’ या मुख्यालयाच्या इमारतीचा लिलाव करून थकीत कर्जापैकी काही रक्कम वसूल करण्याचा बँकांचा प्रयत्न गुरुवारी फोल ठरला.
स्टेट बँक आॅफ इंडियासह इतर सरकारी बँकांनी
या कंपनीस दिलेले
6963
कोटी रुपयांचे
कर्ज थकले आहे.
स्टेट बँकेच्या एसबीआय कॅप ट्रस्टीज या उपकंपनीने ‘सरफासी’ कायद्याचा आधार घेऊन २,४०१ चौ. मीटर क्षेत्रफळाचे ‘किंगफिशर हाऊस’ गेल्या वर्षी ताब्यात घेतले होते.
स्टेट बँक कॅपने १५० कोटी एवढी राखीव किंमत
ठेवून या इमारतीचा ई-लिलाव पुकारला होता. परंतु त्यात एकही बोली आली नाही.
विजय मल्ल्यांनी आरसीबी सोडली
कर्जाच्या वादात अडकलेल्या विजय मल्ल्या यांनी इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) आपल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. आरसीबीने बीसीसीआयला मल्ल्या यांनी संघाच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे पत्राद्वारे कळवले. विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मार्चलाच आयपीएल संचालन समितीला आरसीबीचे अधिकारी रसेल अॅडम्स यांचा ई-मेल मिळाला होता.
मल्ल्यांचे भारतात परतणे अनिश्चित
चौकशीसाठी ईडीपुढे जातीने हजर होण्यासाठी एप्रिलपर्यंतची वेळ मागितल्याने मल्ल्या उद्या शुक्रवारी भारतात परत येण्याची शक्यता मावळल्यात जमा आहे. जबाब नोंदविण्यासाठी १८ मार्च रोजी जातीने हजर राहण्याचे समन्स मल्ल्यांना काढण्यात आले होते. परंतु समन्सनुसार आपल्याला उद्या शुक्रवारी हजर होणे जमणार नाही, असे मल्ल्या यांनी तपास अधिकाऱ्यास कळविले असून एप्रिलपर्यंतची वाढीव मुदत मागितली असल्याचे सूत्रांनी सांगितले.