आधी पक्ष बळकट करू, नंतर महायुती! महाराष्ट्रासाठी भाजपकडून तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 06:33 AM2024-06-27T06:33:00+5:302024-06-27T06:33:58+5:30
महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका घेणार आहेत.
संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांची एक फेरी पुढील आठवड्यात मुंबईत होणार आहे. महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका घेणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पूर्ण ताकद लावण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हेही मुंबईतील भाजप नेत्यांशी निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करणार आहेत.
निवडणूक सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अगोदर पक्ष बळकट करण्यावर भर दिला जाईल. जे नाराज आहेत त्यांना समजवून कामाला लावू, झालेल्या चुका सुधारू आणि मग महायुती मजबूत करू. भाजपकडून कमकुवत क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.
नाराजांना भेटणार
‘भाजप’चे जुने नेते आणि नाराज नेते यांच्या घरी जाऊन भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांना भेटतील आणि त्यांची नाराजी दूर करतील. २०१९ मध्ये भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ९ जागाच जिंकता आल्या आहेत.
‘लाडली बहना’ आता महाराष्ट्रात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘लाडली बहना’ योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एक कोटी महिलांच्या बँक खात्यात दरमहा १२०० ते १५०० रुपये जमा केले जाणार आहेत.