जवानाच्या पत्नीला भेट घेऊ द्या
By admin | Published: February 11, 2017 01:09 AM2017-02-11T01:09:26+5:302017-02-11T01:09:26+5:30
सीमा सुरक्षा दलाच्या त्या जवानाच्या पत्नीला त्याला भेटून त्याच्या सोबत दोन दिवस राहू द्यावे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला सांगितले.
नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या त्या जवानाच्या पत्नीला त्याला भेटून त्याच्या सोबत दोन दिवस राहू द्यावे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला सांगितले. सैनिकांना अत्यंत वाईट दर्जाचे जेवण दिले जाते, असा आरोप समाजमाध्यमातून या जवानाने केला होता. सध्या या जवानाची जेथे नियुक्ती आहे तेथे त्याला त्याची पत्नी भेटू शकेल. त्या जवानाला त्याच्या तक्रारीनंतर सांबा येथे पाठवण्यात आले आहे.
न्यायमुर्ती जी. एस. सिस्तानी आणि विनोद गोयल यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. त्याआधी अतिरिक्त महाअधिवक्ता संजय जैन यांनी बीएसएफचा जवान तेज बहादूर यादव हे कोणत्याही बेकायदा स्थानबद्धतेखाली नसल्याचे व त्यांना जम्मूतील सांबाच्या कालिबारीत असलेल्या ८८ व्या बटालियनमध्ये हलवण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले होते. या माहितीची नोंद घेऊन खंडपीठाने म्हटले की या जवानाच्या पत्नीला आपल्या पतीला धोका आहे अशी भीती वाटत असल्यास तिला व त्यांच्या मुलाला जवानाची भेट घेऊ देण्यास परवानगी द्यावी. आम्ही कोणत्याही शास्त्रात जाऊ नये. जवानाच्या पत्नीला त्याची भेट घेऊ देऊन शंकांचे निरसन झाले पाहिजे, असे खंडपीठाने म्हटले.