काश्मीरमध्ये सरकारी सुट्ट्यांवरून तेढ, उपमुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:36 AM2017-10-02T02:36:37+5:302017-10-02T02:36:46+5:30
जम्मू-काश्मीरमधील ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’ (पीडीपी) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) यांच्या सत्ताधारी आघाडीत राज्य सरकारतर्फे दिल्या जाणा-या सार्वजनिक सुट्ट्यांवरून नवी तेढ निर्माण झाली असून, या सुट्ट्यांचा फेरआढावा घेतला जावा
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’ (पीडीपी) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) यांच्या सत्ताधारी आघाडीत राज्य सरकारतर्फे दिल्या जाणा-या सार्वजनिक सुट्ट्यांवरून नवी तेढ निर्माण झाली असून, या सुट्ट्यांचा फेरआढावा घेतला जावा, असे पत्र भाजपाचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी ‘पीडीपी’च्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना लिहिले आहे.
सार्वजनिक सुट्ट्यांचा विषय ज्या सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारित येतो, तो मुख्यमंत्र्यांकडे असल्याने आपण त्यांना एकूणच सुट्ट्यांचा फेरविचार करण्याविषयीचे पत्र लिहिले आहे, असे निर्मल सिंग यांनी सांगितले. हा फेरविचार करताना जम्मू भागातील जनतेच्या राष्ट्रवादी भावनाही विचारात घेतल्या जाव्यात, असे उपमुख्यमंत्र्यांचे म्हणणे होते.
‘नॅशनल कॉन्फरन्स’ या पक्षाचे संस्थापक शेख अब्दुल्ला यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ५ डिसेंबर रोजी काश्मीर सरकारची सार्वजनिक सुट्टी असते. भाजपाचा त्यास विरोध आहे. निर्मल सिंग यांनी या सुट्टीचा किंवा शेख अब्दुल्ला यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, सरकारतर्फे दिली जाणारी सुट्टी फक्त एकाच पक्षाशी संबंधित असल्याचा संदर्भ दिला.
२३ सप्टेंबर आणि १३ जुलै या वादाच्या आणखी दोन तारखा आहेत. काश्मीरचे पूर्वीचे हिंदू शासक महाराज हरीसिंग यांचा २३ सप्टेंबर हा जन्मदिन. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी द्यावी, अशी हिंदूबहुल जम्मू विभागातील जनतेची जुनी मागणी आहे.
भाजपा याचा उल्लेख लोकांची राष्ट्रवादी भावना असा करते. उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी त्यांच्या पत्रात या मागणीलाही भाजपाचा पाठिंबा असल्याचे नमूद केले
आहे. (वृत्तसंस्था)
महाराज हरीसिंग यांनी सन १९३१ मध्ये १३ जुलै या दिवशीही जनतेचे बंड मोडून काढले होते. त्यात २२ नागरिक (अर्थातच मुस्लीम) ठार झाले होते. काश्मीर सरकारतर्फे हा दिवस ‘हुतात्मा दिन’ म्हणून साजरा केला जातो व त्या दिवशी सरकारी सुट्टीही असते. या सुट्टीलाही भाजपाचा विरोध आहे. एवढेच नव्हे, तर आताच्या सत्ताधारी आघाडीत सामील झाल्यापासून, भाजपाचे मंत्री या हुतात्मा दिनाच्या सरकारी कार्यक्रमास एकाही वर्षी उपस्थित राहिलेले नाहीत.