जेएनयूतील गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 03:36 AM2018-04-24T03:36:52+5:302018-04-24T03:36:52+5:30
जेएनयूमध्ये ८६ टक्क्यांची मोडला नियम; किमान हजेरीही नाही
नवी दिल्ली : वर्गांमध्ये किमान आवश्यक उपस्थिती नसलेल्या सुमारे सात हजार विद्यार्थ्यांच्या पालकांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पत्रे पाठवणार आहे. विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ टक्के विद्यार्थ्यांची (सात हजार) वर्गांत किमान आवश्यक तेवढीही हजेरी नाही. जेएनयूमध्ये ८१00 विद्यार्थी शिकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान आवश्यक उपस्थितीचा विद्यापीठाचा हा ताजा नियम असून किमान तीन एमफील/पीएचडी विद्यार्थ्यांना गैरहजेरीबद्दल इशारा देणारी पत्रे १६ एप्रिल रोजी सहायक निबंधकांच्या कार्यालयाने पाठवली आहेत. पत्रात पालकांना उद्देशून म्हटले आहे की, तुमचा पाल्य गेल्या हिवाळी सत्रापासून ते फेब्रुवारीअखेरपर्यंत (२०१८) सगळे दिवस वर्गात परवानगी न घेता गैरहजर आहे. तुमच्या पाल्याच्या भविष्याचा विचार करता तो वर्गांत उपस्थितीचे नियम पाळल, अशी आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत, असेही पत्रात म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी मात्र विद्यापीठाच्या या कृतीवर टीका केली आहे.
संशोधक विद्यार्थ्यांनाही पत्रे हास्यास्पद
या पत्राबाबत जेएनयु विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्ष सिमोन झोया खान यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, हे संशोधन करणारे विद्यार्थी २७ ते २९ वयोगटातील आहेत. त्यांच्या पालकांना पत्रे पाठवून विद्यापीठाला काय म्हणायचे आहे? काही संशोधक विद्यार्थी विवाहीत असून त्यांना मुलेही आहेत. विद्यापीठाचे हे वागणे विद्यार्थ्याचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे. बी.ए. किंवा एम. ए. च्या विद्यार्थ्यांबाबत मी हे समजू शकते परंतु संशोधक विद्यार्थ्यांनाही पत्रे हे हास्यास्पद आहे.