CCD Owner Missing : सर्व समस्यांशी लढलो; पण..., व्ही. जी. सिद्धार्थ यांचं भावुक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 12:11 PM2019-07-30T12:11:35+5:302019-07-30T13:02:19+5:30

व्ही.जी सिद्धार्थ हे उद्योगातील अडचणींमुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

letter to staff by cafe coffee day owner and son in law of sm krishna vg siddhartha surfaces after he goes missing in mangalore | CCD Owner Missing : सर्व समस्यांशी लढलो; पण..., व्ही. जी. सिद्धार्थ यांचं भावुक पत्र

CCD Owner Missing : सर्व समस्यांशी लढलो; पण..., व्ही. जी. सिद्धार्थ यांचं भावुक पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देव्ही.जी सिद्धार्थ हे उद्योगातील अडचणींमुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. सिद्धार्थ यांनी सीसीडीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना पत्र लिहीलं होतं. बेपत्ता होण्याआधी त्यांनी लिहिलेल्या पत्रात मी एक उद्योजक म्हणून अयशस्वी ठरलो असं सांगितले.

नवी दिल्ली - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे सोमवारपासून बेपत्ता झाले आहेत. व्ही. जी. सिद्धार्थ हे प्रसिद्ध कॅफे चेन CCD (कॅफे कॉफी डे) चे मालक आहेत. सिद्धार्थ हे सोमवारी (29 जुलै) आपल्या कारने प्रवास करत होते. दरम्यान मंगळुरू येथील नेत्रावती नदीच्या परिसरात ते असल्याची माहिती मिळाली होती.

व्ही.जी सिद्धार्थ हे उद्योगातील अडचणींमुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. बेपत्ता होण्याआधी त्यांनी लिहिलेल्या पत्रात मी एक उद्योजक म्हणून अयशस्वी ठरलो असं सांगितले. सिद्धार्थ यांनी सीसीडीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना पत्र लिहीलं होतं. एएनआय या वृत्तसंस्थेने हे पत्र पोस्ट केलं आहे. या पत्रावरुनच सिद्धार्थ हे नैराश्याने ग्रासले असल्याचं समोर येत आहे.

 

'37 वर्षांच्या मेहनतीनंतर आणि परिश्रमानंतर आपण आपल्या कंपनीत 30 हजार रोजगारांची निर्मिती करु शकलो. मात्र यशस्वीरित्या हा व्यवसाय पुढे नेण्यामध्ये मी अपयशी ठरलो आहे. मी माझ्या परिने पूर्ण प्रयत्न केले मात्र हा व्यवसाय नफ्याकडे नेऊ शकलो नाही. माझ्यावर ज्यांनी ज्यांनी विश्वास टाकला त्यांची मी माफी मागतो. सध्या कंपनीला जो तोटा होतो आहे, त्यातून मी कंपनीला सावरु शकत नाही. सहा महिन्यांपूर्वी मी माझ्या एका मित्राकडून मोठ्याप्रमाणावर कर्ज घेतले. माझ्यावर असलेल्या प्रचंड दबावामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं. मी खूप काळ या सगळ्याचा सामना केला. मात्र मला आता हा तणाव सहन होत नाही. इक्विटी पार्टनर्सचाही प्रचंड दबाव माझ्यावर आहे.' असं पत्र व्ही.जी. सिद्धार्थ यांनी लिहिलं आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, काँग्रेस नेते डीके शिवकुमार, बीएस शंकर हेदेखील एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. सोमवारपासून बेपत्ता असलेल्या सिद्धार्थ यांचा फोनही स्विच ऑफ असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ सोमवारी संध्याकाळी जवळपास सहा वाजण्याच्या सुमारास नेत्रावती नदीच्या पुलाजवळ कारमधून उतरले. त्यांनी ड्रायव्हरला लगेचच येतो असं सांगितलं. ड्रायव्हरने ही अर्धा तास त्यांची वाट पाहिली पण सिद्धार्थ परत आलेच नाहीत. तसेच त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा फोनदेखील बंद आहे. त्यामुळे ड्रायव्हरने सिद्धार्थ यांच्या घरी फोन करून ते बेपत्ता असल्याची माहिती दिली. 

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम वेगाने सुरू केली आहे. सिद्धार्थ हे बेपत्ता होण्याआधी काही वेळ त्यांचा ड्रायव्हर त्यांच्या सोबत असल्याने पोलीस ड्रायव्हरची चौकशी करत आहेत. तसेच व्ही. जी. सिद्धार्थ यांचे कॉल डीटेल्सही तपासण्यात येत आहेत. 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने 2017 मध्ये छापे घातले होते. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डे (सीसीडी) ग्रुपचे संस्थापक, मालक व अध्यक्ष आहेत. सिद्धार्थ 17 जानेवारी 2015  रोजी या कंपनीचे अध्यक्ष झाले. या धाडीनंतर शेअर बाजारात कॉफी डे इंटरप्राइजेसचे शेअर भाव कोसळले होते. तर एस. एम. कृष्णा हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. ते काही काळ महाराष्ट्राचे राज्यपाल व त्याआधी केंद्रातही मंत्री होते. 

 

Web Title: letter to staff by cafe coffee day owner and son in law of sm krishna vg siddhartha surfaces after he goes missing in mangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.