LGBTQ Marriage Bhopal: एक भोपाळी, दुसरी नेपाळी! पदरात तीन मुले, पतींना सोडले, दोन्ही महिलांनी लग्न केले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 05:14 PM2022-02-18T17:14:51+5:302022-02-18T17:15:12+5:30
LGBTQ Marriage Bhopal: गोविंदपुरा पोलीस ठाण्यात असलेल्या एनर्जी डेस्कच्या माध्यमातून दोन्ही महिलांचे समुपदेशन करण्यात आले. समुपदेशनादरम्यान दोन्ही महिला कोणत्याही दबावाशिवाय आणि स्वतःच्या मर्जीने एकत्र राहत असल्याचे समोर आले.
भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये विवाहित असूनही दोन महिलांनी एकमेकांशी लग्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या दोन महिला पती-पत्नी म्हणून एकत्र राहत होत्या, त्यांना मुलेही आहेत. एक महिला नेपाळी असून ती शिमल्यात राहते. दुसरी महिला भोपाळची आहे. हा प्रकार नेपाळी संघटनेकडे आल्यानंतर त्यांनी भोपाळ पोलिसांची मदत घेतली. यानंतर भोपाळ पोलिसांनी दोघांचे समुपदेशन करून प्रकरण मिटवले.
या विचित्र प्रेमकथेची सुरुवात शिमल्यापासून झाली. भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेशी शिमल्याच्या नेपाळी महिलेने फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली. ही मैत्री इतकी वाढली की दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर शिमला येथील महिला भोपाळमध्ये राहणाऱ्या महिलेला भेटण्यासाठी आली, त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. दोघांचे लग्न गाझियाबादमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नेपाळी महिलेला दोन मुले आहेत, तर भोपाळमध्ये राहणाऱ्या महिलेला एक मूल आहे. भोपाळमध्ये राहणारी महिला पतीपासून वेगळी राहत होती, तर शिमल्यात राहणारी महिला पतीपासून दूर गेली होती. शिमल्यात महिलेच्या पतीने पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
नेपाळी संघटनेला याची माहिती मिळताच खळबळ उडाली. याप्रकरणी संघटनेने पोलिसांशी संपर्क साधला. महिला गुन्हे शाखेची देखरेख करणाऱ्या एडीसीपी ऋचा चौबे यांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून चौबे यांनी तातडीने कारवाई केली. ही नेपाळी महिला निशातपुरा पोलीस स्टेशन परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, महिलेचा पतीही नेपाळी संस्थेमार्फत शिमल्याहून भोपाळला आला.
गोविंदपुरा पोलीस ठाण्यात असलेल्या एनर्जी डेस्कच्या माध्यमातून दोन्ही महिलांचे समुपदेशन करण्यात आले. समुपदेशनादरम्यान दोन्ही महिला कोणत्याही दबावाशिवाय आणि स्वतःच्या मर्जीने एकत्र राहत असल्याचे समोर आले. दोघींना एकत्र राहून दीड महिना झाला होता. महिला गुन्हे शाखेचे डीसीपी विनीत कपूर यांनी सांगितले की, दोन्ही महिला प्रौढ आहेत आणि त्यांच्यावर कोणताही दबाव नाही. फेसबुकवर त्यांची मैत्री झाली. त्यांनी स्वतः एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. यात गुन्हा घडलेला नाही. समुपदेशनानंतर शिमला येथील महिलेने पतीसोबत राहण्यास होकार दिला.