महाविकास आघाडी सरकार उखडून जनतेची सुटका करा; जे. पी. नड्डा यांचा कार्यकर्त्यांना संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 07:18 AM2021-11-08T07:18:11+5:302021-11-08T07:18:18+5:30
भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संदेश
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राजधानीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर महावसुली आणि भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप केला. असे सरकार उखडून टाकून जनतेची सुटका करायची आहे, असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सेवा आणि लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा मंत्र दिला.
भाजपामध्ये परिवारवाद नाही. सेवा, संकल्प आणि समर्पण यामुळेच हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे, असे मत मांडून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मोदी म्हणाले की, सामान्य नागरिकांशी सतत चांगले संपर्क असल्यानेच भाजप आज केंद्रात सर्वोच्च स्थानी आहे. पंतप्रधान नमो अॅपवरील कमल पुष्प फीचरला उल्लेख करून मोदी म्हणाले की, या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान आणि निस्वार्थ भावनेने केलेले सेवाकार्य लोकांसमोर आणले पाहिजे.
आगामी निवडणुका जिंकण्याचा विश्वास
पक्षाने पारित केलेल्या राजकीय प्रस्तावांमध्ये आगामी काळात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणीपूरमध्ये भाजपला चांगला विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांत निवडणुकांसाठी संघटनेने केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले. प. बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान तृणमूल काँग्रेसने हिंसाचार केल्याचा आरोप करण्यात आला. कोरोना साथीच्या काळात विरोधी पक्षांच्या एकूण वागणुकीबाबत यावेळी टीका करण्यात आली.
अडवाणी-जोशी व्हीसीद्वारे सहभागी
बैठकीस गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथसिंह, पीयूष गोयल यांच्यासह सर्व ज्येष्ठ उपस्थित होते. पक्षाचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.
मोदी सरकारच्या कामगिरीची स्तुती
नड्डा यांनी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने घेतलेल्या निर्णयांची स्तुती केली. कोरोनासंकटात लागू केलेला लॉकडाऊन, आरोग्य सुविधांची उपलब्धता तसेच चांगल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली असे ते म्हणाले.