तामिळनाडूतील मंदिरे शासन नियंत्रणातून मुक्त करा; सद्गुरूंचे १०० ट्वीट्समधून आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 05:40 AM2021-03-28T05:40:12+5:302021-03-28T05:40:34+5:30
ईस्ट इंडिया कंपनीने दिलेल्या दुर्दैवी वारशामुळे, तामिळनाडूमधील हिंदू मंदिरे अजूनही सरकारच्या अखत्यारीत आहेत
नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मंदिरांना शासकीय नियंत्रणातून सोडविण्याची हाक देत, राज्यातील मंदिरांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सद्गुरूंनी १०० ट्वीट्सची मोहीम सुरू केली आहे.राज्यातील राजकीय पक्ष आणि नेतृत्व यांना कडक निवेदन करताना सद्गुरू आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “फ्री टीएन टेम्पल्स’’ ही अतीव यातनेतून जन्मलेली चळवळ आहे. आज मी कुणालाही दबाव टाकण्यासाठी नव्हे, तर अगदी तीव्र वेदनांनी १०० ट्वीट करीत आहे. समाजाच्या या यातनेचा आवाज ऐकलाच गेला पाहिजे.
ईस्ट इंडिया कंपनीने दिलेल्या दुर्दैवी वारशामुळे, तामिळनाडूमधील हिंदू मंदिरे अजूनही सरकारच्या अखत्यारीत आहेत. यामुळे वैभवशाली तामिळ परंपरेचा ऱ्हास झाला आणि तिचा गळा घोटला गेला. एचआर अँड सीई (हिंदू धार्मिक व धर्मादाय एंडोव्हमेंट्स विभाग), ज्यांच्या अखत्यारीत राज्यातील ४४,२२१ मंदिरे आहेत. १,१२,९९९ मंदिरांना दररोज पूजेसाठी कोणताही महसूल नाही, असे मद्रास उच्च न्यायालयात सांगण्यात आले.
आपल्या हृदयद्रावक ट्वीट्समध्ये संपूर्ण तामिळनाडूमधील भक्तांनी पाठविलेले फोटो आणि व्हिडिओ त्यांनी शेअर केले असून, तामिळ संस्कृतीच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्याकडे केलेल्या दुर्लक्षातून झालेली दुरवस्था त्यातून दिसते.
दयनीय अवस्थेमुळे मनाला वेदना
ट्वीटसमवेत असलेल्या व्हिडिओमध्ये सद्गुरू म्हणतात, “ही महान कला, तामिळ संस्कृतीचा आत्मा, तामिळ लोकांचे हृदय, या ठिकाणचे पालनपोषण करणाऱ्या भक्तीच्या मूळ स्रोताची अशी अवस्था पाहून हृदय पिळवटून निघते. ही भाषा, आपल्या कला आणि हस्तकला सर्वकाही जपली गेली ती भक्तीमुळे. तामिळ असणारी प्रत्येक गोष्ट भक्तीमध्ये रुजलेली आहे आणि या भक्तीचा पाया ही मंदिरे आहेत. आज त्यांना अशा दयनीय अवस्थेत पाहून मनाला अतिशय वेदना होतात. आता या मंदिरांना बंधमुक्त करण्याची वेळ आली आहे.”