एलआयसी खरेच आर्थिक संकटात आहे का? जाणून घ्या व्हायरल सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:39 PM2019-10-10T12:39:09+5:302019-10-10T12:40:10+5:30
Life Insurance Corporation (LIC) : एलआयसीमध्ये देशातील जवळपास प्रत्येकाची पॉलिसी आहे. बाजारात मंदी असल्याने हा पैसा बुडाल्याचे वृत्त पसरले होते.
देशाची सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसी तोट्यात असल्याने लाखो पॉलिसीधारकांचे पैसे असुरक्षित असल्याचा मॅसेज सोशल मिडीयावर गेल्या काही दिवसांपासून फिरत आहे. यामुळे पॉलिसीधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. पीएमसी बँकेवर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती आहे. त्यातच आर्थिक मंदीमुळे देशातील मोठमोठ्या कंपन्यांना काम बंद ठेवावे लागत आहे. यामुळे एलआयसीने त्यामध्ये गुंतवलेला पैसा बुडाल्याचा मॅसेज फिरत आहे.
एलआयसीमध्ये देशातील जवळपास प्रत्येकाची पॉलिसी आहे. सरकारी गुंतवणूकदार कंपनी आयएल अँड एफएस दिवाळखोरीत निघाली आहे. यामध्येही एलआयसीने पैसे गुंतविले होते. तसेच अन्य काही कंपन्यांमध्ये एलआयसी पॉलिसीधारकांचा पैसा गुंतवत असते. बाजारात मंदी असल्याने हा पैसा बुडाल्याचे वृत्त पसरले होते. एलआयसीने यावर खुलासा केला आहे.
ग्राहकांचा पैसा बुडालेला नसून आम्ही या वृत्ताचे खंडन करतो, असे एलआयसीने स्पष्ट केले आहे. काही समाजकंटकांकडून एलआयसी आर्थिक संकटात असल्याची अफवा पसरविण्यात येत असून ग्राहकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन एलआयसीने केले आहे.
2018-19 या आर्थिक वर्षात पॉलिसीधारकांना एलआयसीने आतापर्यंतचा सर्वाधिक 50000 कोटींचा बोनस दिला आहे. एलआयसीचा मार्केट शेअर मार्चमधील 66.24 टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये 73.06 टक्क्यांवर गेला होता.
एलआयसीने काही हजार कोटींचा पैसा अनेक कंपन्यांमध्ये गुंतवला ज्या कंपन्यांचा शेअर गुंवणूक किंमतीपेक्षा कमी आहे, अशी अफवा पसरली होती.