एलआयसीच्या विभागीय व्यवस्थापकांची परिषद संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 04:43 AM2019-05-25T04:43:59+5:302019-05-25T04:44:38+5:30
या परिषदेत एलआयसीच्या देशभरातील ११३ विभागांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला.
मुंबई : आगामी वर्षातील व्यापाराची ध्येय धोरणे तसेच कॉर्पोेरेट रणनीती निश्चित करण्यासाठी एलआयसीच्या विभागीय व्यवस्थापकांची दोन दिवसांची परिषद मुंबईत २० ते २२ मे रोजी पार पडली.
या परिषदेत एलआयसीच्या देशभरातील ११३ विभागांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला. एलआयसीच्या आठ झोनचे प्रमुख, विविध विभागांचे आॅपरेशल हेडस, कॉर्पोरेट कार्यालयातील कार्यकारी संचालक आदींही यात सहभागी झाले. एलआयसीचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालकांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. दोन दिवसांच्या परिषदेत ध्येय धोरणे, रणनीती आखण्यासाठी गटचर्चा, त्यानुसार वर्षभर आखावयाचे विविध उपक्रम यावर सविस्तर विचारविनिमय करण्यासाठी विविध सत्रे घेण्यात आली. परिषदेत विपणन, ग्राहकसेवा, माहिती तंत्रज्ञान, मनुष्यबळ, आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर वर्षभराची रणनीती निश्चित करण्यात आली.
एकूण विमा पॉलिसीच्या विचार करता एलआयसीकडे सध्या बाजारातील ७४.७१ टक्के वाटा आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रिमियमच्या स्वरुपात एलआयसीला १,४२,१९१ कोटी मिळाले. ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांची यशस्वी पूर्तता करण्याचे प्रमाण नेहमीप्रमाणे अभिमानास्पद राहिले आहे. या परिषदेत परिषदेत २०१८ -१९ वर्षात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
२२ मे रोजी परिषदेला आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राकेश शर्मा यांना प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शर्मा यांनी येत्या काळात एलआयसी देशभरातील कार्यालये आणि बँकेची आऊटलेट यांच्या माध्यमातून कशा उत्तम सेवा देता येतील, यावर मत मांडले. (वा. प्र)