भारताला सियाचिन जिंकून देणारे लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 07:56 PM2020-01-07T19:56:33+5:302020-01-07T19:57:22+5:30
सियाचिन ग्लेशियरवर कब्जा करण्यासाठीच्या ऑपरेशन मेघदूतचे हून यांनी केले होते नेतृत्व
नवी दिल्ली - जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी असलेल्या सीयाचिनमध्ये पाकिस्तानला धूळ चारून तिरंगा फडकवण्यात मोलाची भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून यांचे आज निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. पंचकुला येथील एका रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
सियाचिन ग्लेशियर ताब्यात घेण्यासाठी 1984 मध्ये राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मेघदूतचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून यांनी केले होते. 1980 च्या सुमारास पाकिस्तानने रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या सियाचिनच्या दिशेने आपल्या सैनिकांना रवाना करण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानने सियाचिनमधील शिखर ताब्यात घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाने 1984 मध्ये ऑपरेशन मेघदूत सुरू केले होते. अखेरीस भारतीय जवानांनी प्राण तळहातावर घेत सियाचिनवर कब्जा केला आणि पाकिस्तानचे मनसुबे धुळीस मिळवले. ऑपरेशन मेघदुतबरोबरचे अनेक लष्करी मोहिमांमध्ये जनरल हून यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून यांचा जन्म पास्तानमधील एबटाबाद येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय भारतात आले होते. लष्कारील विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर 1984 मध्ये त्यांनी ऑपरेशन मेघदूत यशस्वी केले होते. अखेरीस 1987 मध्ये पश्चिम कमांडचे प्रमुख असताना ते लष्करातून निवृत्त झाले होते. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी 2013 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.