तिसाव्या दिवशीही जनजीवन विस्कळीत
By Admin | Published: August 8, 2016 04:29 AM2016-08-08T04:29:36+5:302016-08-08T04:29:36+5:30
काश्मिरात काही भागांत अद्यापही संचारबंदी लागू असल्याने सलग तिसाव्या दिवशी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला असून
श्रीनगर : काश्मिरात काही भागांत अद्यापही संचारबंदी लागू असल्याने सलग तिसाव्या दिवशी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला असून, सहा हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिज्बुलचा कमांडर बुऱ्हाण वनी याचा मृत्यू झाल्यानंतर ९ जुलैपासून हा हिंसाचार उसळला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी श्रीनगरच्या सहा पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात नौहट्टा, खानयार, रैनावाडी, सफालकदल, महाराजगंज आणि बटमालू या भागांचा समावेश आहे.
अनंतनाग आणि बडगाम जिल्ह्यांच्या दोन शहरांत चदुरा आणि खानसाहिब येथे व कुपवाडाच्या दोन शहरांत हंदवाडा आणि लांगते येथे संचारबंदी कायम आहे. फुटीरवाद्यांनी आपले आंदोलन १२ आॅगस्टपर्यंत वाढविले आहे. आंदोलनाच्या या काळात आपल्या भागात आणि हॉस्पिटलच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, असे आवाहन फुटीरवाद्यांनी केले आहे. (वृत्तसंस्था)