बंगळुरूत जनजीवन आले पूर्वपदावर; संचारबंदी उठविली
By admin | Published: September 15, 2016 03:01 AM2016-09-15T03:01:49+5:302016-09-15T03:01:49+5:30
कावेरीच्या पाण्यावरून झालेल्या हिंसाचारानंतर बुधवारी परिस्थिती सुधारल्यामुळे बंगळुरूसह सर्व १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी उठविण्यात आली
बंगळुरू : कावेरीच्या पाण्यावरून झालेल्या हिंसाचारानंतर बुधवारी परिस्थिती सुधारल्यामुळे बंगळुरूसह सर्व १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी उठविण्यात आली. व्यावसायिक प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये उघडण्यासह रस्ता वाहतूक आणि मेट्रो सेवाही सुरू झाली आहे.
सकाळी ९ वाजता संचारबंदी उठविण्यात आल्यानंतर देशाच्या या आयटी राजधानीतील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले. मात्र, बंगळुरूत जमावबंदी लागूच राहील, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तामिळनाडूत कानडी लोक आणि त्यांच्या मालमत्तांवर हल्ले झाल्याचे वृत्त आल्यानंतर बंगळुरूत हिंसाचार उफाळला.
सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजीच्या आपल्या आदेशात बदल करीत कर्नाटकने तामिळनाडूला २० सप्टेंबरपर्यंत १२,००० क्युसेक पाणी सोडावे, असे निर्देश दिले होते. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी हिंसाचारग्रस्त भागांचा बुधवारी दौरा केला. कावेरी वादावरून कर्नाटकात तामिळींवर झालेल्या हल्ल्यांच्या विरोधात तामिळनाडूच्या विविध व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी १६ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली असून, द्रमुकसह विरोधी पक्षांनी या बंदला बुधवारी पाठिंबा दिला. (वृत्तसंस्था)