काश्मिरात जनजीवन अद्यापही विस्कळीत
By admin | Published: August 2, 2016 04:30 AM2016-08-02T04:30:40+5:302016-08-02T04:30:40+5:30
काश्मिरात सोमवारीही काही भागांत संचारबंदी आणि उर्वरित भागांत जमावबंदी लागू राहिल्यामुळे सलग २४ व्या दिवशी खोऱ्यातील जनजीवन सुरळीत होऊ शकले नाही.
श्रीनगर : काश्मिरात सोमवारीही काही भागांत संचारबंदी आणि उर्वरित भागांत जमावबंदी लागू राहिल्यामुळे सलग २४ व्या दिवशी खोऱ्यातील जनजीवन सुरळीत होऊ शकले नाही. श्रीनगर शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत व अनंतनाग शहरातील संचारबंदी कायम असून, खोऱ्यात सर्वत्र चार किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. श्रीनगरमधील नौहाटा, खान्यार, रैनावाडी, सफाकदल व महाराजगंजमध्ये संचारबंदी लागू आहे.
निदर्शनांदरम्यान लोक मृत्युमुखी पडल्याच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे खोऱ्यातील जनजीवन सलग २४ व्या दिवशीही ठप्प होते. खोऱ्यात ८ जुलैपासून सुरू असलेल्या या हिंसाचारात ४९ लोक ठार झाले असून, ५६०० हून अधिक जखमी झाले आहेत. सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी चकमकीत मारला गेल्यानंतर हा हिंसाचार उफाळला होता. खोऱ्यात दुकाने, शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि खासगी कार्यालये बंद होती, तर रस्त्यावरही शुकशुकाट पसरला होता. संपूर्ण खोऱ्यात आजही मोबाईल इंटरनेट सेवा खंडित होती. (वृत्तसंस्था)
>घुसखोरी फसली; दहशतवाद्याचा खात्मा
श्रीनगर : काश्मीरच्या नौगाम सेक्टरमधील ताबा रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न सोमवारी उधळून लावत लष्कराने एका दहशतवाद्याला कंंठस्नान घातले. एका आठवड्यातील घुसखोरीच्या प्रयत्नांची ही तिसरी घटना आहे.