काश्मिरात जनजीवन विस्कळीत

By admin | Published: March 30, 2017 02:02 AM2017-03-30T02:02:16+5:302017-03-30T02:02:16+5:30

हिंसक संघर्षानंतर काश्मीर खोऱ्याच्या संवेदनशील भागात बुधवारी अतिरिक्त सुरक्ष दले तैनात करण्यात आली

Life time disrupted in Kashmir | काश्मिरात जनजीवन विस्कळीत

काश्मिरात जनजीवन विस्कळीत

Next

श्रीनगर : हिंसक संघर्षानंतर काश्मीर खोऱ्याच्या संवेदनशील भागात बुधवारी अतिरिक्त सुरक्ष दले तैनात करण्यात आली. सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत सामान्य नागरिक मृत्युमुखी पडल्याच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे खोऱ्यातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
परिस्थितीच्या दृष्टिकोनातून काश्मीर विद्यापीठ, केंद्रीय विद्यापीठ काश्मीर आणि इस्लामिक युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुरक्षा दले आणि त्यांच्यावर दगडफेक करणाऱ्यांत मंगळवारी झालेल्या चकमकीत तीन तरुण ठार, तर इतर १८ जण जखमी झाले होते. हे लोक दगडफेक करून सुरक्षा दलांची दहशतवाद प्रतिबंधक मोहीम उधळू पाहत होते.
बडगाम येथे एका दहशतवाद्याचा खात्मा केल्यानंतर ही मोहीम संपुष्टात आली. श्रीनगरमध्ये आज बंदमुळे बहुतांश दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, पेट्रोलपंप आणि शहरातील शैक्षणिक संस्था बंद होत्या. सरकारी वाहनेही रस्त्यावरून गायब होती, तर शहराच्या काही भागांत खासगी कार, कॅब आणि आॅटोरिक्षांची वाहतूक सुरू होती.
खोऱ्यातील इतर जिल्हा मुख्यालयांतही बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची वृत्ते आहेत. मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चदुरासारख्या संवेदनशील भागांत अतिरिक्त सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हुर्रियत गटांचे प्रमुख सय्यद अली शाह गिलानी, मिरवैज उमर फारुक आणि जेकेएलएफप्रमुख मोहंमद यासीन मलिक यांनी कालच्या घटनेच्या निषेधार्थ बंदचे आवाहन केले होते. फुटीरवाद्यांनी लोकांना शुक्रवारच्या नमाजनंतर निदर्शने करण्याचे आवाहन केले होते.

मोर्चा उधळला, आमदार ताब्यात
मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणारे अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले.
कार्यकर्ते रशीद यांच्या जवाहरनगर येथील सरकारी निवासस्थानी गोळा झाले होते. त्यानंतर मुफ्ती यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी त्यांनी गुपकार रोडच्या दिशेने मोर्चा काढला. तथापि, पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मोर्चा हाणून पाडला.

अतिरेक्यांचा पोलीस ठाण्यावर गोळीबार
श्रीनगर : दक्षिण काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा पोलीस ठाण्यावर बुधवारी सायंकाळी ५.५० वाजता बंदुकधारी अतिरेक्यांनी हल्ला केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. अतिरेक्यांनी पोलीस ठाण्यावर सहा फैरी झाडल्या. तीन नागरिक सुरक्षा दलाच्या हल्ल्यात ठार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱ्या लोकांत मिसळत हल्लेखोर अतिरेकी तेथून पसार झाले, असे पोलिसांनी सांगितले.

अधिकाऱ्याच्या घरात तोडफोड
दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसून तोडफोड केली. खोऱ्यात गेल्या सात दिवसांत घडलेली अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे.

Web Title: Life time disrupted in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.