उ. भारताला पावसाने झोडपले; बिहारमध्ये विजा पडून २१ जण ठार, कोसी नदीला महापूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 11:20 AM2024-07-14T11:20:42+5:302024-07-14T11:23:04+5:30
बिहारातील भागलपूरमध्ये गंगा आणि कोसीला महापूर आल्यामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत
नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, बिहारात विजा कोसळून २४ तासांत २१ जण ठार झाले आहेत. सूत्रांनी सांगितले की, बिहारातील भागलपूरमध्ये गंगा आणि कोसीला महापूर आल्यामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. रोहतासमधील तुतला भवानी धाम धबधब्याच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने सहाजण धारेत अडकले. वनविभाग पथकांनी त्यांची सुटका केली.
उत्तर प्रदेशच्या नेपाळ सीमेवरील जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर होत आहे. पिलीभीत, लखीमपूर खीरी, बहराइच, श्रावस्ती, बलरामपूर, सिद्धार्थनगर आणि महाराजगंज या जिल्ह्यांतील ८०० गावांना पुराचा वेढा पडला आहे. शाहजहानपूरमधील दिल्ली-लखनौ महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी बंद आहे. बलरामपूरच्या प्राथमिक शाळेत ३ फुटांपर्यंत पाणी साठले आहे.
हिमाचलमध्ये १५ महामार्ग बंद
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे शनिवारी सकाळी १५ राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. मंडीमधील ८, सिमलामधील ४ आणि कांगडामधील ३ महामार्गांचा त्यात समावेश आहे. ४७ विद्युत ट्रान्सफार्मर बंद पडले. राज्यात १९ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी आहे.
८ राज्यांमध्ये अलर्ट जारी
भारतीय हवामान खात्याने उत्तर भारतातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, पंजाब, हरयाणा, जम्मू, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या आठ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, आणि छत्तीसगढमध्ये वादळी वाऱ्यासहस विजा कोसळण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे.
आसाम : मृतांची संख्या १०६
आसामात पूरस्थिती गंभीर असून, आणखी सात लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १०६ झाला आहे. २३ जिल्ह्यांतील १२.३३ लाख लोकांना पुराचा फटका बसला.
मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट
मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केली आहे. त्यामुळे रस्ते, रेल्वे व हवाई वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दिल्लीत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. शनिवारी सकाळी पावसामुळे दिल्लीत तापमान घसरले. मयूर विहार भागात १५.५ मिमी पाऊस पडला.