"सर्व काही बाऊन्सरसारखं घडलंय, चेहरा वाचवण्यासाठी बहिष्कार टाकण्याचं नाटक", हिमंत बिस्वा सरमांचा विरोधकांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 07:24 PM2023-05-24T19:24:21+5:302023-05-24T19:25:29+5:30
काँग्रेससह 19 राजकीय पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. याआधी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह 19 राजकीय पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. यावर बहिष्कार घालणे निश्चित होते असे हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.
नवीन संसद भवनाच्या बांधकामालाही विरोधकांनी विरोध केला. मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, विरोधी पक्षांनी कधीच विचार केला नव्हता की ही इमारत इतक्या लवकर पूर्ण होईल. सर्व काही विरोधकांसाठी बाऊन्सरसारखे घडले आहे. केवळ चेहरा वाचवण्यासाठी बहिष्कार टाकण्याचे नाटक करत आहेत. तसेच, वीर सावरकरांच्या जन्मदिनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे, हे देखील त्यांच्या निषेधाचे एक कारण असू शकते, असेही सरमा म्हणाले.
दरम्यान, नवीन संसद भवन उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याबाबत सर्व 19 पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, या विशेष प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हा केवळ महामहिमांचा अपमानच नाही तर लोकशाहीवर थेट हल्ला आहे. तसेच, निवेदनात पुढे म्हटले आहे की, लोकशाहीचा आत्माच संसदेतून हद्दपार झाला आहे, तेव्हा आम्हाला नवीन इमारतीचे मूल्य दिसत नाही.
याचबरोबर, राष्ट्रपती हे केवळ भारताचे राष्ट्रप्रमुख नसून ते संसदेचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याशिवाय संसद चालू शकत नाही. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, या निवेदनात नरेंद्र मोदींनाही लक्ष्य करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने संसद पोकळ करत असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे.