प्रभू राम, कृष्ण यासारखेच नरेंद्र मोदी दैवी अवतार; भाजपा मंत्र्यांनी सांगितले मोदी का जन्मले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 04:42 PM2022-01-18T16:42:00+5:302022-01-18T16:43:20+5:30
आपल्या धर्म आणि संस्कृतीत म्हटलं आहे की, जेव्हा कधीही भारतावर कोणतं संकट येईल अथवा अत्याचार वाढेल तेव्हा दैवी अवतार जन्माला येईल असं भाजपा नेत्याने म्हटलं आहे.
भोपाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता वर्ग देशात मोठ्या प्रमाणात आहे. २०१४ पासून देशात मोदी लाट आली आणि एकेकाळी २ जागा मिळालेल्या भाजपानं थेट केंद्रात सरकार बनवलं. २०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपानं पक्ष म्हणून बहुमताचा आकडा गाठला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा करिष्मा असल्याचं बोललं जातं त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्याही वाढली. आता मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपा नेता कमल पटेल यांनी मोदींना दैवी अवताराची उपमा देऊन टाकली आहे.
कमल पटेल म्हणाले की, देशात काँग्रेसकडून सुरु असलेला अत्याचार, भ्रष्टाचार आणि देशाच्या संस्कृती रक्षणासाठी, नैराश्य असलेले वातावरण संपुष्टात आणण्यासाठी प्रभू राम आणि कृष्णाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीही दैवी अवतार म्हणून जन्माला आलेत. सोमवारी हरदा येथे पत्रकारांशी संवाद साधताना पटेल यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींद्वारे करण्यात येत असलेली कार्य भारताला विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर घेऊन जात आहेत. देशाला भ्रष्टाचारमुक्त करणं आणि लोकांचे कल्याण करणं हे सामान्य व्यक्तींकडून पूर्ण होऊ शकत नाही असं ते म्हणाले.
तसेच आपल्या धर्म आणि संस्कृतीत म्हटलं आहे की, जेव्हा कधीही भारतावर कोणतं संकट येईल अथवा अत्याचार वाढेल तेव्हा दैवी अवतार जन्माला येईल. प्रभू राम हे मनुष्य अवतारात आले होते आणि राक्षस रावणाला मारुन आणि अन्य वाईट शक्तींना हरवून लोकांची रक्षा करत रामराज्याची स्थापना केली होती. कंसचे अत्याचार वाढले म्हणून भगवान कृष्ण जन्माले आले आणि कंसची क्रूरता संपवून सर्वसामान्यांना दिलासा दिला असं कमल पटेल यांनी सांगितले.
‘या’साठी झाला मोदींचा जन्म
दरम्यान, अशाप्रकारेच जेव्हा काँग्रेसचा अत्याचार वाढला, भ्रष्टाचार वाढला, जातीवाद वाढला. देशाची संस्कृती नष्ट व्हायला लागली. चहुबाजूने नैराश्याचं वातावरण निर्माण झालं. तेव्हा हे संपवण्यासाठी नरेंद्र मोदींचा जन्म झाला. भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विश्वगुरु बनणार आहे. ज्यांनी लोकांना भ्रष्टाचारमुक्त सरकार आणि सर्वसामान्यांचे कल्याण केले. हे अशक्य कार्य आहे जे साधारण मनुष्य पूर्ण करू शकत नाही. जरी शक्य असतं तरी ६० वर्ष लागली असती. त्यासाठी नरेंद्र मोदींसारख्या अवतारी पुरुषाचा जन्म झाला आणि त्यांनी हे कार्य पूर्ण केले. ते दैवी अवतार आहेत असं कमल पटेल यांनी सांगितले.